खुलताबाद | सलमान फय्याज खान
खुलताबाद तालुक्यातील मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित ग्रामपंचायतींची प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी राखीव जागा निश्चित करण्यासाठी १२ जून रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली.
आरक्षण सोडतीनंतर १९ जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १९ ते २५ जून या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. प्राप्त हरकतींवर ३ जुलै रोजी अभिप्राय नोंदविण्यात येणार असून ८ जुलै रोजी अंतिम मंजुरी दिली जाईल. त्यानंतर १० जुलै रोजी अंतिम प्रभागरचना व आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत कसाबखेडा, खिर्डी, खांडीपिंपळगाव, गदाना, गल्लेबोरगाव, झरी, टाकळी राजेराय, ताजनापूर, धामणगाव, निरगुडी बु., पळसवाडी, पिंपरी, मावसाळा, म्हैसमाळ, वडोद खुर्द, वेरूळ, सराई, सुलतानपूर, सोनखेडा, कनकशिळ, कागजीपुरा, बाजारसावंगी, भडजी, बोडखा, वडोद बु. आणि गोळेगाव या २६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
• आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक
• १२ जून – आरक्षण सोडत
• १९ जून – प्रारूप आरक्षण प्रसिद्ध
• १९ ते २५ जून – हरकती व सूचना स्वीकारणे
• ३ जुलै – हरकतींवर अभिप्राय
• ८ जुलै – अंतिम मंजुरी
• १० जुलै – अंतिम आरक्षण अधिसूचना व प्रभागरचना प्रसिद्ध.

0 Comments