Hot Posts

6/recent/ticker-posts

जर जरी जरबक्ष यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजनाचा सविस्तर आढावा


खुलताबाद, 17 जुलै 2026 : येत्या १७ ऑगस्टपासून खुलताबाद येथे हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जरबक्ष (रह.) यांच्या ७४० व्या उरूस यात्रेला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. १७) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली उरूसाच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि विविध विभागांच्या समन्वयाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी उरूस व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन यांनी उरूस यात्रेदरम्यान आवश्यक असलेल्या विविध सुविधांबाबत प्रस्ताव मांडले. भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वाहनतळ, वीजपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांचे नियोजन प्रभावीपणे करण्याची मागणी त्यांनी केली.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा सत्कार करताना नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल, दर्गा कमिटी अध्यक्ष एजाज अहेमद, माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन व अन्य 


यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उरूसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, अखंडित वीजपुरवठा, स्वच्छतागृहे, एसटी बस सेवा, वाहतूक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. उरूसासाठी आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच सार्वजनिक सुविधांवर विशेष भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यात्रेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

उरूस काळात वाहनतळ, राहटपाळणे तसेच इतर मनोरंजनाच्या साधनांमुळे गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनबद्ध व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणा आणि आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवण्यावरही भर देण्यात आला.

यंदा ७४० वा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत येत असल्याने खुलताबादमध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करावे, तसेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यात्रा काळात आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, तहसील कार्यालय आणि खुलताबाद नगरपालिका यांनी परस्पर समन्वयाने काम करून यात्रा सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पाडावी, जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उरूस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्याधिकारी तथा समितीचे सचिव समीर शेख, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, दरगाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, उपाध्यक्ष इमरान जहांगीरदार, सचिव मोहम्मद मतीन, सदस्य सचिव कामरान अहमद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस दरगाह कमिटीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन, मुबशीरोद्दीन, सालेह मोहम्मद, हबीबोद्दीन, अबरार अहमद, कामरानोद्दीन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी दरगाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद व सदस्यांनी उरूसासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे आभार मानले.

बैठकीच्या शेवटी हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष (रह.) यांच्या ७४० व्या उरूस यात्रेचे नियोजन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख पद्धतीने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून उरूस यशस्वी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

Post a Comment

0 Comments