Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरस्कार मिळाला, पण गाव विकासापासून वंचित?; येसगाव ग्रामपंचायतीविरोधात गंभीर आरोप, बाबासाहेब खंडागळे यांचे निवेदन


खुलताबाद,३ जुलै २०२६ :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत येसगाव ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हाभरात नाव कमावले. ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र या पुरस्कारानंतर गावातील मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खंडागळे यांनी ग्रामसेवक व उपसरपंच यांना निवेदन देत ग्रामपंचायतीच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. निवेदनात गावातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. खंडागळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गावातील सार्वजनिक शौचालयांचे शौचखड्डे गेल्या सुमारे ३० वर्षांपासून वापरातच आलेले नाहीत. या खड्ड्यांमध्ये साचलेले व तुंबलेले पाणी पावसाळ्यात घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही या समस्येकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच गावात आजही दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही, महिलांसाठी रोजगारनिर्मिती किंवा स्वयंरोजगाराचे कोणतेही ठोस उपक्रम राबविण्यात आलेले नाहीत. याशिवाय गावातील सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा नसल्याने स्वच्छतेचे गंभीर प्रश्न कायम असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, याच येसगाव ग्रामपंचायतीने केलेल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत खुलताबाद तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत गौरव प्राप्त केला होता. त्यामुळे गावातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा पुरस्कार नेमका कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आला, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बाबासाहेब खंडागळे यांनी संबंधित यंत्रणेकडे या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून वास्तवाची पडताळणी करावी तसेच गावातील प्रलंबित मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे. या निवेदनामुळे येसगाव ग्रामपंचायतीच्या पुरस्कारप्राप्त कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments