खुलताबाद, 15 ऑगस्ट 2026 - तालुक्यातील ममनापूर शिवारातील गट क्रमांक ११ येथे नवीन विद्युत डीपी (रोहित्र) बसविण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव तसेच ममनापूर येथील शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने नवीन डीपी मंजूर करून कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
सध्याची जुनी डीपी ओव्हरलोड झाल्यामुळे परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गट क्रमांक ११ परिसरातील शेतकरी आणि शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिसरात मोठी वस्ती असून अनेक शेतकरी शेतीसाठी विद्युत पंपांवर अवलंबून आहेत. मात्र सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीचे नुकसान होण्याबरोबरच जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार डीपीजवळ जावे लागते. शेतवस्तीचा परिसर असल्याने रात्रीच्या वेळी रानडुक्कर, बिबट्या यांसह वन्यप्राण्यांचा धोका असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
कचरे वस्ती, चव्हाण मळा आणि इतर शेतवस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शेतीकामे, पाण्याची व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, महावितरणच्या खुलताबाद उपविभागाकडून २६ मार्च २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे नवीन १०० केव्हीए डीटीसी उभारण्याबाबत तांत्रिक अंदाजपत्रक सादर करण्यात आल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. या प्रस्तावात विद्यमान ओव्हरलोड डीटीसीचा भार कमी करण्यासाठी नवीन डीटीसीची तरतूद करण्यात आली असून एचटी लाईन, डीटीसी आणि एलटी लाईनच्या कामांचा समावेश आहे. या तांत्रिक अंदाजपत्रकाची अंदाजित किंमत ३ लाख ६८ हजार ५७० रुपये असल्याचे कागदपत्रात नमूद आहे. सदर कामास डीपीडीसी योजनेअंतर्गत मंजुरी देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात नवीन डीपी कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
नवीन डीपीची मागणी करणाऱ्या निवेदनावर ममनापूर येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री प्रक्रिया पुढे नेण्याबरोबरच प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून नवीन डीपीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.
“आम्ही गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. परिसरात मोठी शेतवस्ती असून ओव्हरलोडमुळे वारंवार फॉल्ट होत आहेत. पावसाळ्यात वन्यप्राण्यांचा धोका असताना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीजवळ जाणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि शेतीच्या नुकसानीचा विचार करून नवीन डीपी लवकरात लवकर देण्यात यावी,” अशी विनंती शेतकरी बांधवांच्या वतीने पांडुरंग जाधव यांनी केली आहे.

0 Comments