खुलताबाद, 15 ऑगस्ट 2026 - खुलताबाद नगरपरिषदेच्या कारभाराची तसेच विकासकामांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इकबाल पटेल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी (ता. ११) महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले. नगरपरिषदेच्या निवडणुकीला सुमारे आठ महिने उलटूनही नागरिकांना अपेक्षित ठोस व परिणामकारक विकासकामे झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खुलताबाद शहरातील पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर झालेल्या विकासकामांची, त्यासाठी झालेल्या निधीच्या वापराची, निविदा प्रक्रियेची, कामांच्या गुणवत्तेची तसेच नागरिकांना मिळालेल्या प्रत्यक्ष लाभाची स्वतंत्र व निष्पक्ष प्रशासकीय तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील आठ महिन्यांत मंजूर, सुरू, पूर्ण आणि प्रलंबित असलेल्या सर्व विकासकामांची स्वतंत्र यादी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक कामासाठी मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, कामाचा आदेश, मोजमाप पुस्तिका, देयके आणि काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र यांची तपासणी करून त्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे निवेदनात नमूद आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून गटारमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी असल्यास त्याची प्रत्यक्ष चौकशी करून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा, करार, पात्रता निकष, दर आणि कामाचा कालावधी यांचीही स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एखाद्या संस्थेला मागील अनेक वर्षांत वारंवार कामे मिळाली असल्यास त्यामागील कारणांची चौकशी करावी तसेच निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली होती का, याची तपासणी करावी, अशी मागणी आहे. रद्द करून पुन्हा काढण्यात आलेल्या निविदांच्या अटी, पात्रता निकष आणि त्यानंतर झालेल्या प्रक्रियेचीही चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय व तांत्रिक अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती गठित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या समितीमार्फत मागील आठ महिन्यांतील विकासकामे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल प्रशासकीय तपासणी करून मंजूर, पूर्ण, अपूर्ण आणि प्रलंबित कामांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशी मागणी आहे.
विकासकामांचे विशेष लेखापरीक्षण करून निधीचा वापर, कामांची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासावी. तसेच सर्व निविदा प्रक्रियेत पारदर्शकता, समान संधी, पात्रता आणि स्पर्धात्मक दरांचे पालन झाले आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी. भविष्यातील मोठ्या विकासकामांसाठी ई-निविदा, पारदर्शक खरेदी प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, मोजमाप पुस्तिकेची पडताळणी आणि काम पूर्णत्वाचे लेखापरीक्षण यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान आर्थिक, प्रशासकीय अथवा निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी. तसेच निवेदनावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक कारवाईसाठी नसून खुलताबाद शहराचा पारदर्शक, जबाबदार आणि गुणवत्तापूर्ण विकास सुनिश्चित करण्यासाठी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
इस पर आधारित thumbnail बनाओ

0 Comments