‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः’ या उक्तीचा प्रत्यय देत जोगेश्वरी पूर्व आणि लगतच्या परिसरात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबवण्यात आला. ‘दि रिदम डान्स अकॅडमी’च्या वतीने अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथील शाखांमध्ये ‘गुरुपौर्णिमा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
आजच्या आधुनिक आणि कलियुगाच्या काळात बालसंस्कार टिकवून ठेवण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्यातील पहिले गुरू हे आपले आई-वडील असतात, ही भावना मुलांच्या मनात रुजवण्यासाठी अकॅडमीमध्ये विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे औक्षण केले, त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि भावी वाटचालीसाठी उज्वल भविष्याचा संकल्प केला.
पौराणिक कथांचा संदर्भ देत, श्री गणेशाने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याऐवजी आपल्या माता-पित्यालाच प्रदक्षिणा घालून सर्वोच्च स्थान दिले होते. याच धड्याची पुनरावृत्ती करत बालवयातच पालकांबद्दल आदर आणि कृपेची भावना निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांच्या मूळ संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. नवीन पिढीला श्रावण बाळाचे धडे मिळावेत आणि पालकांचे आयुष्यातील मोल समजावे, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या सप्ताहात परिसरातील नागरिक आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास प्रतिसाद दिला.

0 Comments