खुलताबाद, 23 जुलै 2026 - खुलताबाद तालुक्यातील निरगुडी (ठाकरवाडी) येथील गट क्रमांक ७० मधील गायरान क्षेत्रात सन १९७८ पासून शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या अतिक्रमणधारकांना अद्याप ७/१२ उताऱ्यावर नोंद व शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन संबंधितांच्या नावावर ७/१२ नोंदी करण्यात याव्यात, अन्यथा दि. २६ जुलै २०२६ पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसील प्रशासनाला देण्यात आला आहे.
यासंदर्भात तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मौजे निरगुडी (ठाकरवाडी) येथील गट क्रमांक ७० मधील गायरान जमिनीवर अनुसूचित जमातीचे अनेक कुटुंबीय गेल्या ५० ते ६५ वर्षांपासून शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाच्या विविध आदेशांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या नावावर ७/१२ नोंद होणे अपेक्षित असतानाही संबंधितांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.
निवेदनानुसार, या प्रश्नासाठी यापूर्वी तत्कालीन वैजापूर तसेच सध्याचे कन्नड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा निवेदने सादर करून आंदोलन करण्यात आले. महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित अतिक्रमणधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानंतर गट क्रमांक ७० मधील काही अतिक्रमणधारकांच्या नावावर ७/१२ नोंदी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याच गटातील समान परिस्थितीतील इतर पात्र लाभार्थ्यांच्या नावांची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे समान न्यायाच्या तत्त्वाला हरताळ फासण्यात आला असून प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित जमिनीचे पंचनामे करून अहवाल सादर केले असून ग्रामपंचायतीनेही अनेक वेळा मंजुरीचे ठराव दिले आहेत. महसूल विभागाकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार व आवश्यक कागदपत्रेही प्रशासनाकडे सादर करण्यात आली असून, सर्व पुरावे उपलब्ध असतानाही प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आल्याने अतिक्रमणधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गायरान व वन जमिनीवरील संबंधित अतिक्रमणधारकांच्या नावावर ७/१२ उताऱ्याची नोंद करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने एका आठवड्याच्या आत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २६ जुलै २०२६ पासून आमरण उपोषण, तसेच गरज पडल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष राजअनंत सुरतकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, खुलताबाद यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, वन विभाग, मंडळ अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना पाठविण्यात आल्या असून, प्रशासनाने तातडीने न्याय्य निर्णय घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संबंधित अतिक्रमणधारकांच्या स्वाक्षऱ्या असून त्यामध्ये परसराम गणपत साळवे, बाबू कडुबा बनकर, गोविंद आसाराम कातवारे, कडुबा गणपत चाबुकस्वार, विठ्ठल आसाराम कातवारे, लक्ष्मीबाई गौतम साळवे, शकुंतला भानुदास साळवे, सिताबाई यशवंत नरवडे आणि धुपताबाई कडुबा बनकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी गेल्या अनेक दशकांपासून कसत असलेल्या गायरान जमिनीची ७/१२ नोंद करून शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

0 Comments