Hot Posts

6/recent/ticker-posts

विश्रांतीसाठी बेडरूम, गरम पाण्यासाठी गिझर... स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसाठी खासदार वायकरांनी उभारले 'सुपर' ऑफिस!

वृत्तांकन: संदिप कसालकर

धुराच्या कोंदटातून कर्मचाऱ्यांची सुटका; सर्व सोयींयुक्त वातानुकूलित कार्यालयाचे शानदार लोकार्पण!

मुंबई: स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी आता तडजोड नाही! मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या खासदार निधीतून जोगेश्वरी येथील 'कै. राजेश्वर रागिणवार हिंदू प्रतापनगर स्मशानभूमी'त कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा अद्ययावत वातानुकूलित (AC) मृत्यू नोंदणी कार्यालयाची उभारणी केली आहे. या वास्तूचे लोकार्पण नुकतेच खासदार वायकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील या स्मशानभूमीत जुने कार्यालय सरणाच्या अगदी जवळ असल्याने, मृतदेहांच्या दहनाचा धूर थेट कार्यालयात घुसत असे. यामुळे कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही कठीण झाले होते. कर्मचाऱ्यांची ही व्यथा जाणून घेताच खासदार वायकर यांनी तातडीने पावले उचलली आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ धुरापासून मुक्त अशा सुरक्षित ठिकाणी नवीन कार्यालयाची उभारणी केली.

काय आहेत नव्या कार्यालयातील खास सोयी?

केवळ कार्यालयच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून येथे 'फाईव्ह स्टार' सुविधा देण्यात आल्या आहेत:

  • AC कॅबिन: कडाक्याच्या उन्हात आणि धुरापासून सुटका करण्यासाठी पूर्णपणे वातानुकूलित व्यवस्था.
  • लॉकर सुविधा: अस्थी सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक लॉकर टाईप कपाट.
  • विश्रांती कक्ष: रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरामदायी बेडरूम.
  • अद्ययावत फर्निचर: नवीन दर्जेदार टेबल, खुर्च्या आणि प्रशस्त कामकाजाची जागा.
  • स्वच्छता व आरोग्य: गरम पाण्यासाठी गिझरसह सुसज्ज बाथरूम.
  • नागरिकांसाठी सोय: स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांसाठी बसण्यासाठी नवीन बाकडी (बेंच).

"स्मशानभूमीत काम करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. लवकरच विश्वेश्वर मंदिराबाहेर कूलर लावून थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली जाईल."रवींद्र वायकर, खासदार

या सोहळ्याला चंद्रकांत वायकर, सौ. दीप्ती वायकर-पोतनीस, निखिल प्रवीण शिंदे, अनिरुद्ध नारकर, अनिल म्हसकर, संजय महाडिक, उपेश (बंटी) सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments