Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्तर-पश्चिम मुंबईचा कायापालट होणार! खासदार रवींद्र वायकर ॲक्शन मोडमध्ये; पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी ५ मे २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव आणि दिंडोशी भागातील जनतेसाठी अनेक धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.


अनधिकृत बांधकामांवर चालणार हातोडा!

बैठकीत आयुक्तांनी कडक पवित्रा घेत अनधिकृत कामांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत:

  • रॉयल पाम व आरे: रॉयल पाममधील अनधिकृत बंगले आणि आरे कॉलनीतील बेकायदेशीर स्टुडिओजवर लवकरच पालिकेचा हातोडा चालणार आहे.

  • दिंडोशी (कुरार पॅटर्न): नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि हॉटेल्सवर पुढच्या आठवड्यापासून तोडक कारवाई सुरू होणार आहे.

  • अनियमितता: जोगेश्वरी व अंधेरी भागात 'कल्पतरू' विकासकाने केलेल्या अनियमिततेबाबत सविस्तर नोट सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा

  • ट्रॉमा केअर हॉस्पिटल: जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरली जाणार असून, महिनाभरात सर्व सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

  • मिनी फायर स्टेशन: आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी ट्रॉमा रुग्णालयाच्या शेजारीच एक 'मिनी फायर स्टेशन' उभारले जाणार आहे.

  • सिद्धार्थ रुग्णालय: गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अस्मिता आणि बाजारपेठांचा विकास

  • शिवरायांचा पुतळा: पेप्सी कंपाऊंड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

  • मार्केट पुनर्विकास: दत्ताजी साळवी मार्केट आता महानगरपालिका स्वतः बांधणार आहे. यासोबतच नवलकर मार्केट, निर्मलाताई रागीनवार मार्केट, यारी रोड वर्सोवा आणि सुकी मच्छी मार्केटचा विकासही लवकरच केला जाईल.

  • गटई कामगार: हातावर पोट असणाऱ्या गटई कामगारांसाठी महापालिका लवकरच स्वतंत्र धोरण जाहीर करणार आहे.

"जनतेच्या समस्या सोडवणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आजच्या बैठकीत २० पेक्षा जास्त विषयांवर सकारात्मक निर्णय झाले असून, कामांचा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील."

रवींद्र वायकर, खासदार (उत्तर-पश्चिम मुंबई)


या बैठकीला पालिकेचे मालमत्ता अधिकारी कबरे, आरोग्य उपायुक्त शरद उघडे यांच्यासह विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, अल्ताफ पेवेकर, स्वप्नील टेंबवलकर, वैभव भराडकर, राजु पेडणेकर, उपविभाग प्रमुख दिलीप शिंदे, नगरसेविका वर्षा टेंबवलकर, प्रियांका पेडणेकर, मनीषा वायकर, दीप्ती वायकर पोतनीस, माजी नगरसेविका राजुल पटेल आणि बाबू धामापूरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments