वृत्तांकन: संदिप कसालकर
जोगेश्वरी (प्रतिनिधी): एका बाजूला मुंबईकरांना पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचे आवाहन करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जोगेश्वरी पूर्व भागात मात्र एखाद्या खासगी विकासकाचे 'वकील' असल्यासारखे वागत आहेत का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. जोगेश्वरी पूर्व येथील शाम नगर परिसरात 'अष्टविनायक बिल्डर' कडून होत असलेल्या पाण्याच्या उधळपट्टीमुळे आणि पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजी खैरनार यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी शाम नगर येथील अष्टविनायक बिल्डरच्या साईटवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे स्थानिक महिलांच्या निदर्शनास आले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी या प्रकरणाची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली असता, तब्बल पाच तास पिण्याचे शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना येण्या-जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागला.
प्रशासकीय 'टंगळमंगळ' आणि बिल्डरची पाठराखण?
या गंभीर प्रकाराबाबत खैरनार यांनी आपत्कालीन विभाग (१९१६) आणि 'के-पूर्व' विभागाच्या नियंत्रण कक्षाला तातडीने कळवले. मात्र, संतापजनक बाब म्हणजे अधिकारी कारवाई करण्याऐवजी उलट शिवाजी खैरनार यांनाच "ते पाणी पिण्याचे नसून बिल्डर बोरिंगच्या पाण्याने टाकी धुवत आहे" असे सांगून बिल्डरची पाठराखण करण्यात मग्न होते.
"जर टँकर आत आलाच नाही, तर पाच तास पाणी आले कुठून? विकासक रस्त्यावर अनधिकृत खोदकाम करून कनेक्शन जोडतो, तेव्हा प्रशासन झोपलेले असते का?" असा बोचरा सवाल खैरनार यांनी उपस्थित केला आहे.
कायद्याचा बडगा फक्त सर्वसामान्यांवरच?
गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळांकडून जागेचे भाडे आणि दंड वसूल करणारी महानगरपालिका, अशा प्रकारे पाणी वाया घालवणाऱ्या आणि रस्ते उखडणाऱ्या बिल्डरांना पाठीशी का घालत आहे? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
कायद्याचे उल्लंघन आणि तांत्रिक मुद्दे:
१. पाण्याचा अपव्यय (Water Wastage): मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय करणे हा गुन्हा असून त्यावर मोठा दंड किंवा कनेक्शन कापण्याची तरतूद आहे.
२. अनधिकृत रस्ते खोदकाम (Unauthorized Trenching): विकासकाने स्वतः खड्डा खोदून कनेक्शन केल्याचे व्हिडिओ पुरावे असतानाही 'स्ट्रीट व्हेंट' किंवा 'रोड कटिंग' नियमावलीनुसार कारवाई का झाली नाही?
३. नागरिकांची सुरक्षितता: रस्त्यावर पाणी सोडून चिखल करणे आणि सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण करणे यावरही दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे.
नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित 'के-पूर्व' विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर आणि मुजोर 'अष्टविनायक बिल्डर'वर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी खैरनार यांनी केली आहे.
0 Comments