मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

सेवागौरव सोहळ्यात पवार सरांच्या कार्याचा गौरव; शिक्षकांच्या जबाबदारीवर पांडुरंग जाधव यांचे प्रेरणादायी मनोगत

अक्षर आकार:


खुलताबाद, ६ जुलै २०२६: न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, गदाना (ता. खुलताबाद) येथे ज्येष्ठ शिक्षक रणजीत रामकृष्ण पवार यांच्या सेवागौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, "शिक्षक ही केवळ पदवी नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. देशाचे भवितव्य घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असतात आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून घडते."

ते पुढे म्हणाले की, आई-वडील आपल्या मुलांना एका दगडाप्रमाणे शाळेत पाठवतात; मात्र त्या दगडाला सुंदर मूर्तीचा आकार देण्याचे कार्य जसा मूर्तिकार करतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षक हे झाडाच्या खोडाप्रमाणे स्वतः स्थिर राहून विद्यार्थ्यांना फांद्यांप्रमाणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतात. तसेच रस्ता स्वतः जागेवरच राहतो, परंतु त्यावरून प्रवास करणाऱ्याला इच्छित स्थळी पोहोचवतो; त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात, असे त्यांनी सांगितले.

 रणजीत रामकृष्ण पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, पोलीस अधिकारी, वकील, शिक्षक तसेच विविध शासकीय व प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच दिले नाही, तर संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारीही शिकवली. कर्तव्यदक्ष, निष्ठावान आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचे जाधव यांनी नमूद केले.

"पवार सरांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक शिक्षकाने घ्यावा. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी वयोमर्यादा असते, मात्र आपल्या कार्याचा ठसा कायमस्वरूपी उमटविणारे व्यक्तिमत्त्व विरळाच असते. पवार सरांनी आपल्या सेवेतून समाजाला एक आदर्श दिला असून त्यांच्या कार्याबद्दल कितीही बोललो तरी शब्द अपुरे पडतील. त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम," अशा शब्दांत पांडुरंग जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमास शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवागौरव सोहळ्यात पवार सरांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)