भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

खाकी वर्दीतला 'देवदूत'! ड्युटीवर नसतानाही प्रियांका जाधव यांनी वाचवलं एका चिमुरडीचं आयुष्य; थरारक रेल्वे प्रवासाची 'ही' गोष्ट वाचून तुम्हीही कराल सलाम!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई/छत्रपती संभाजीनगर:   'पोलीस' म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो ड्युटीवरचा कडक शिस्तप्रिय माणूस. पण खाकी वर्दीच्या आतही एक हळवं 'आईचं' हृदय असतं आणि कर्तव्याची जाणीव रक्ताच्या प्रत्येक थेंबात असते, याचा जिवंत पुरावा नुकताच जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळाला. दिंडोशी पोलीस ठाण्यातील रणरागिणी महिला पोलीस अंमलदार प्रियांका जाधव यांच्या सतर्कतेने एका १२ वर्षांच्या मुलीचा जीव एका मोठ्या चक्रव्यूहात अडकण्यापासून वाचला आहे.

रेल्वेचा प्रवास आणि 'त्या' मुलीचे धक्कादायक उत्तर! 

४ फेब्रुवारीची ती सकाळ... जनशताब्दी एक्सप्रेस दादरवरून छत्रपती संभाजीनगरकडे सुसाट वेगाने धावत होती. याच गाडीत दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रियांका जाधव प्रवास करत होत्या. त्यांच्या शेजारीच एक १२ वर्षांची चिमुरडी बसली होती. बाहेरचं जग काय आहे याची पुसटशीही कल्पना नसलेली ती मुलगी एकटीच प्रवास करताना पाहून प्रियांका यांच्यातील पोलीस जागृत झाला.

त्यांनी तिला मायेने जवळ घेत विचारलं, "बाळा, कुठे चाललीस?" मुलीने उत्तर दिलं, "शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला चाललेय." पण जेव्हा प्रियांका यांनी विचारलं, "तिथे तुला घ्यायला कोण येणार?" तेव्हा त्या मुलीने दिलेलं उत्तर काळजात धडकी भरवणारं होतं. "तिथे माझं कोणीच नाही, मी गेल्यावर तिथे स्वतःच शाळा शोधणार आहे!" एका १२ वर्षांच्या मुलीने अनोळखी शहरात एकटीने जाऊन शाळा शोधण्याचं धाडस करणं, यातच सर्व काही आलं होतं. ती मुलगी घरातून न सांगता निघून आली होती, हे प्रियांका यांनी ताडले.

आईचा रडवेल्या आवाजात फोन आणि 'तो' एक दिलासा!

मुलगी घाबरू नये म्हणून प्रियांका जाधव यांनी मोठ्या खुबीने तिला गप्पांत गुंतवलं. गप्पांच्या ओघात तिच्याकडे असलेल्या शाळेच्या फॉर्मवरून वडिलांचा नंबर शोधला आणि तातडीने फोन लावला. पलीकडून मुलीच्या आईचा रडण्याचा आवाज आला—   "साहेब, आमची इशा हरवलीये, आम्ही तिला सगळीकडे शोधतोय!"   प्रियांका यांनी तात्काळ सांगितलं, "ताई, काळजी करू नका, तुमची लेक माझ्यासोबत सुरक्षित आहे." हा एक शब्द त्या कुटुंबासाठी पुनर्जन्मासारखाच होता.

दामिनी पथकाची एन्ट्री अन् सुखरूप सुटका!

प्रियांका जाधव यांनी गाडी छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यापूर्वीच तेथील वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या 'दामिनी पथका'ला सतर्क केले. गाडी प्लॅटफॉर्मला लागताच त्या मुलीला विश्वासाने दामिनी पथकाच्या स्वाधीन केले. आज ती चिमुरडी आपल्या आई-वडिलांच्या कुशीत सुखरूप आहे. जर प्रियांका जाधव यांनी त्या दिवशी प्रसंगावधान राखलं नसतं, तर ती मुलगी चुकीच्या हातांत पडण्याची मोठी भीती होती.

कर्तव्याला सलाम! ड्युटीवर नसतानाही, प्रवासाच्या थकव्यापेक्षा एका मुलीच्या सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या प्रियांका जाधव यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशस्वी कामगिरीसाठी त्यांना महिला पोलीस उपनिरीक्षिका दरेकर आणि सहाय्यक फौजदार वाघरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

"पोलीस सदैव तुमच्या सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य प्रियांका जाधव यांनी खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवलं आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा! 

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर