छत्रपती संभाजीनगर,३जुलै २०२६ :जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जोगेश्वरी येथील मुख्याध्यापक यशवंत नारायण आवारे यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निःस्वार्थ आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेचा गौरव करणारा सेवागौरव तथा सेवा समाप्ती समारंभ छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल एमएच-२० येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी, मित्रपरिवार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया मांजरमकर उपस्थित होत्या. तसेच माजी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर , छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत जोगेश्वरीचे प्रवीण दुबीले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोसिन पठाण, माजी शालेय अध्यक्ष काकासाहेब दुबीले, नितीन पाटील, रामेश्वर जाधव, प्रमोद हावळे, कैलास गायकवाड, साहेबराव वाणी पाटील, गजानन दौड, स्वप्नील तांगडे प्रमुल पाटील भगवान आवारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आवारे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न, शिस्तप्रियता, अभ्यासावरील निष्ठा आणि समाजाभिमुख कार्य यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या सेवेला सलाम केला. गेल्या ३५ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे शिक्षक म्हणून त्यांनी जपलेला आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी आवारे सरांच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी त्यांच्या प्रेमळ स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचे भावनिक प्रसंग सांगितले. सरांच्या आवडत्या विद्यार्थिनी कु. श्रावणी गायकवाड (इयत्ता चौथी) हिने व्यक्त केलेले हृदयस्पर्शी मनोगत उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले. जोगेश्वरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, मित्रपरिवार आणि आवारे सरांचे कुटुंबीय या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता बरबडे यांनी प्रभावीपणे केले, तर दुर्गादासरोडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. भावनिक वातावरणात संपन्न झालेला हा सेवागौरव सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना शेवटी व्यक्त करण्यात आल्या.

0 Comments