Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक बोरसे मृत्यूप्रकरण : संशयित PSI एकनाथ नागरगोजे, अंमलदार बणगेला बडतर्फ करणार!, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही


खुलताबाद,२ जुलै २०२६ : राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, की संशयित पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोलीस अंमलदार वाल्मिक बणगे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराचा उल्लेख केला आहे. परंतु, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी व्हिसेरा व हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीसाठी नमुने राखून ठेवण्यात आले आहेत. त्याचा अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध सबळ पुराव्यांच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल, असे भोयर म्हणाले.


घटनेची पार्श्वभूमी...

वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील संदीप आवारे आणि रवींद्र आवारे या चुलत भावांमध्ये संपत्तीवरून जुना वाद असून, याच वादातून रवींद्र आवारे याला जीवे मारण्यासाठी हल्ला झाला होता. संदीप आवारेला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, अंमलदार वाल्मीक बनगे यांचे पथक रवींद्र आवारे या वाळू तस्कर व अवैध दारू विक्रेत्याच्या गाडीतून वेरूळला १० जूनच्या रात्री गेले होते. केशव बाबाच्या मठासमोरील एका घरात संशयास्पदरित्या झाडाझडती घेत असतानाच गोंधळ उडाला. त्याचवेळी शिक्षक बोरसे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या लहान मुलांना आईस्क्रीम आणण्यासाठी घराबाहेर आले होते.

त्यांनी पोलीस व त्यांच्यासोबतच्या व्यक्तींना "तुम्ही कोण आहात आणि मध्यरात्री काय करताय?,' अशी विचारपूस केली. त्याचा राग येऊन नागरगोजे, बनगे व सोबतच्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यात शिक्षक बोरसे यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा पोलिसांनी सुरुवातीपासून प्रकरणातील आरोपींना वाचवल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणातील सर्वांना काही तासांतच जामीन मिळालेला आहे. दीर्घकाळ तर संशयित पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे याचा आरोपींत समावेशच नव्हता. उलट तो ड्युटीवर कार्यरत होता. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने नागरगोजेला निलंबित करून अटक झाली होती. मात्र त्यालाही २४ तासांत जामीन मिळाला होता.

Post a Comment

0 Comments