छत्रपती संभाजीनगर,दि. १ जुलै २०२६ - राज्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'राज्यव्यापी शाळा बंद' आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनांनी दिला आहे.या संयुक्त निवेदनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र TET/CTET उत्तीर्ण सिनिअर शिक्षक कृती समिती, खासगी शाळा शिक्षक संघटना तसेच इतर समविचारी शिक्षक संघटनांचा सहभाग आहे.
• शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
१. कार्यरत शिक्षकांसाठी TET अनिवार्यता शिथिल करावी.
२. पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
३. शिक्षकांवर परिणाम करणारे अन्यायकारक शासन निर्णय मागे घ्यावेत.
४. संवर्ग समायोजन धोरण रद्द करावे.
५. BLO तसेच इतर अशैक्षणिक कामांतून प्राथमिक शिक्षकांची पूर्णपणे मुक्तता करावी.
• शिक्षक संघटनांची भूमिका
शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांवर सातत्याने अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून शिक्षकांवरील मानसिक आणि शारीरिक ताणही वाढत आहे.तसेच, पदोन्नती प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. TET संदर्भातील नियमांमुळे हजारो कार्यरत शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.संवर्ग समायोजन धोरणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची तसेच शिक्षकांची कमतरता निर्माण होण्याची भीतीही संघटनांनी व्यक्त केली आहे.
•९ जुलैला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
शासनाने शिक्षकांच्या रास्त मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा ९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'राज्यव्यापी शाळा बंद' आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.ही माहिती शिक्षक समितीचे मराठवाडा विभागीय प्रसिद्धीप्रमुख सतीश कोळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Tags: #TeachersProtest #SchoolBandh #MaharashtraTeachers #TET #BLO #Education #Maharashtra #TeacherNews #SchoolEducation #मराठीबातम्या

0 Comments