भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

शेतकऱ्यांना वीज नाकारण्याच्या वक्तव्याचा निषेध; गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, 31 जुलै, 2026 - राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत केल्याचे सांगितल्या जाणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांनी सरकारने या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन संबंधित मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

पांडुरंग जाधव म्हणाले की, देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी शेतीत अन्नधान्य पिकवून संपूर्ण समाजाचे पोट भरतो. अशा शेतकऱ्यांनाच वीज मिळाली नाही तरी चालेल, असे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी असून ते शेतकरी वर्गाचा अपमान करणारे आहे. उद्योगधंदे महत्त्वाचे असले तरी शेती आणि अन्नसुरक्षा यापेक्षा कोणतेही क्षेत्र मोठे असू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

जाधव यांनी पुढे सांगितले की, राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांना आजही नियमित व दर्जेदार वीजपुरवठा मिळत नाही. वीज यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांचे तसेच जनावरांचे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सुविधा सुधारण्याऐवजी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

"एका धान्याचे हजारो धान्य करणारा शेतकरी टिकला तरच देश टिकेल. शेती थांबली तर उद्योगधंदेही चालणार नाहीत. अन्नाशिवाय कोणताही विकास शक्य नाही," असे सांगत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवून दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर सरकारने योग्य ती कारवाई करावी आणि शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पांडुरंग जाधव यांनी निवेदनाद्वारे केली. त्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित वक्तव्यावर पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक चर्चेला उधाण आले आहे.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर