वृत्तांकन: संदिप कसालकर
मुंबईत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली नियमांना हरताळ फासणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर असलेल्या 'रत्नपार्क बार' वर अंधेरी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्रा कलाकारांच्या ओळखपत्रात फेरफार केल्याप्रकरणी बार मॅनेजर, कॅशियर आणि वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई काय?
अंधेरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, 'रत्नपार्क बार'मध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांच्या ओळखपत्रांबाबत सरकारी नियमांचे पालन केले जात नाही. ५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास पोलीस निरीक्षक कावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक परकाळे, महिला पो.शि. पडसे, पो.शि. मोरे आणि इतर अंमलदारांचा समावेश होता.
ओळखपत्राचा 'झोल' उघड!
पोलिसांनी बारमध्ये प्रवेश केला असता, तिथे ७ महिला गायिका स्टेजवर बसलेल्या आढळल्या. त्यांच्या गळ्यात असलेल्या ओळखपत्रांची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. सरकारी नियमानुसार ओळखपत्रावर कलाकाराचे पूर्ण नाव आणि पत्ता असणे बंधनकारक आहे, मात्र या बारमधील ओळखपत्रांवर केवळ नावाचे जुजबी उल्लेख होते. हा प्रकार पोलीस आयुक्तांनी दिलेल्या 'प्रिमायसेस लायसन्स फॉर्म डी' मधील अटींचे थेट उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले.
या आरोपींवर झाली कारवाई:
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी खालील चौघांना ताब्यात घेतले आहे:
१. युवराज दादू सिंह – बार मॅनेजर
२. वकील अहमद हाश्मी – कॅशियर
३. इंद्रेश बोरे गौंडा – वेटर
४. कृष्ण शन्नेश्वर यादव – वेटर
या चौघांविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.क्र. ३०७/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
बारची रचनाही संशयास्पद!
तपासणी दरम्यान पोलिसांना असेही आढळले की, बारचा हॉल 'एल' (L) आकाराचा असून तिथे जाण्या-येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात होता. तसेच प्रवेशासाठी जाड लाकडी दरवाजांचा अडथळा निर्माण करण्यात आला होता, जेणेकरून पोलिसांची चाहुल लागताच हालचाली लपवता येतील. मात्र, पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने ही कारवाई यशस्वी केली.
पोलिसांचा इशारा:
अंधेरी परिसरात परवान्यातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या बार मालकांना या कारवाईमुळे कडक इशारा मिळाला आहे. "नियम पाळा, अन्यथा खाकीचा हिसका सोसा," असा स्पष्ट संदेश अंधेरी पोलिसांनी दिला आहे.

0 Comments