मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

अंधेरीच्या ‘लोटस कमांडो’ बारमध्ये गुन्हे शाखेची ‘मिडनाईट एन्ट्री’; ऑर्केस्ट्राच्या तालावर नियमांची ऐशीतैशी, मॅनेजर पोलिसांच्या जाळ्यात!

अक्षर आकार:

वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई: रात्रीची वेळ... अंधेरीच्या गुंदवली परिसरातल्या ‘लोटस (हॉटेल कमांडो बार)’ मध्ये ऑर्केस्ट्राचा आवाज घुमत होता. ग्राहक मजेत होते, कलाकार सादरीकरणात दंग होते. पण त्याचवेळी बाहेर खाकी वर्दीचा मोठा सापळा रचला जात होता, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. गुन्हे शाखा कक्ष १० च्या पथकाने रात्री पावणेबाराच्या सुमारास या बारमध्ये 'धडक एन्ट्री' केली आणि एका क्षणात सगळा माहोल बदलला!

प्रभारींचा आदेश आणि ‘खाकी’ ॲक्शन मोडमध्ये!

गुन्हे शाखा कक्ष १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे यांना माहिती मिळाली होती की, काही बारमध्ये परवान्यातील नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षिका पूनम यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षिका अश्विनी रायबोले आणि त्यांच्या पथकाने अंधेरी पोलिसांच्या मदतीने रात्रीचा 'फिल्डिंग' लावली.

आत शिरताच काय दिसले?

रात्री ११:४५ वाजता पोलीस पथक आणि दोन पंच 'लोटस बार'मध्ये शिरले. बारमध्ये ७ महिला गायिका गाणी सादर करत होत्या. पण नियमांचा विचार केला, तर नियमांची पायमल्ली सुद्धा तितकीच करण्यात आली होती.

  • स्टेजला चिटकूनच सोफे: नियमाप्रमाणे स्टेज आणि ग्राहकांमध्ये ५ फुटांचे अंतर हवे, पण इथे ग्राहकांना चक्क स्टेजला लागूनच बसवण्यात आले होते.
  • सुरक्षेचा रामभरोसे कारभार: बारमध्ये येण्या-जाण्यासाठी फक्त एकच दरवाजा! उद्या काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर ग्राहकांनी बाहेर कसे पडायचे? याचा विचारही बार व्यवस्थापनाने केला नव्हता.
  • नो पार्किंग, फक्त गोंधळ: ग्राहकांच्या गाड्या लावण्यासाठी कोणतीही अधिकृत जागा नव्हती.

मॅनेजरने दाखवला माज, पण पोलिसांपुढे झुकला!

तपासणी सुरू असताना बार मॅनेजर आनंदकुमार जगदंबाप्रसाद तिवारी याने सुरुवातीला पोलिसांना अंगझडती देण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवताच त्याची बोलती बंद झाली. राहुल राजेंद्र नाईक यांच्या नावावर असलेला हा बार तिवारी ‘पावर ऑफ ॲटर्नी’द्वारे चालवत असल्याचे समोर आले.

मॅनेजरवर गुन्हा दाखल, बार चालकांचे धाबे दणाणले!

परवान्यातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार पवन धनसिंग शिंदे यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस हवालदार जगताप, पोलीस शिपाई डफळे, पोलीस शिपाई निर्मळे आणि अंधेरीचे पोलीस हवालदार पुजारी व पोलीस शिपाई मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

थोडक्यात सांगायचे तर...

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवणाऱ्यांसाठी हा मोठा इशारा आहे. आता अंधेरीतील इतर बार चालकांमध्येही या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली आहे!











Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)