Hot Posts

6/recent/ticker-posts

"आता आणखी एकही बळी नको!" भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी खुलताबादमध्ये 7 दिवसांचा अल्टिमेटम


खुलताबाद, 24 जुलै 2026 : तालुक्यातील कसाबखेडा येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र सिताराम वाघ यांनी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

निवेदनात तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव अधोरेखित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात सुमारे 500 ते 700 तर खुलताबाद शहरात 150 ते 200 भटके कुत्रे मोकाट फिरत असल्याचा दावा करण्यात आला असून महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वाघ यांनी नगरपरिषद व पंचायत समितीने सात दिवसांत विशेष सभा घेऊन भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस ठराव मंजूर करावा, तसेच Animal Birth Control (ABC) आणि Anti Rabies Vaccination (ARV) मोहीम 15 दिवसांत सुरू करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक आणि ग्रामपंचायत परिसराला प्राधान्य देत "कुत्रेमुक्त क्षेत्र" घोषित करावे, पाळीव कुत्र्यांची सक्तीची नोंदणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

15 व्या वित्त आयोग, डीपीसी आणि सीएसआर निधीतून प्रत्येक ग्रामपंचायतीस किमान दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून, सात दिवसांत झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी बोलताना विरेंद्र वाघ म्हणाले, "कसाबखेड्यात गेलेला जीव परत येणार नाही. प्रशासनाने आता तरी जागे होऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यापुढे आणखी एक जरी बळी गेला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची असेल." निवेदन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्यांना सादर करण्यात आले.

Post a Comment

0 Comments