छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै 2026: देशभरात पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीमुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय करणारा असल्याचे सांगत, यामागील दोषींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस केलेला अभ्यास, संघर्ष, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी पाहिलेली स्वप्ने एका चुकीमुळे उद्ध्वस्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जाधव म्हणाले, "जर पेपर फुटल्यामुळे परीक्षा पुन्हा घेतल्या जात असतील, तर जनतेने विश्वासाने निवडून दिलेले आमदार-खासदार पक्षांतर करून फुटल्यावर त्या मतदारसंघातील निवडणुकाही पुन्हा घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांसाठी एक नियम आणि लोकप्रतिनिधींसाठी दुसरा नियम असू शकत नाही. जनतेच्या मताचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान समान असला पाहिजे," असा सवाल त्यांनी सरकारला केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक आई-वडिलांची आपल्या मुलांनी शिकून मोठे अधिकारी, डॉक्टर किंवा यशस्वी नागरिक व्हावे, अशी इच्छा असते. यासाठी शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब पालक स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून, प्रसंगी उपाशी राहूनही मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करतात. हाडाचे काडे करून, रक्ताचे पाणी करून ते मुलांच्या भविष्यासाठी झटत असतात. मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या कष्टावर पाणी फिरत असून, विद्यार्थी आणि पालक दोघेही मानसिक तणावात सापडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने आता झोपेचे सोंग न घेता जागे होण्याची वेळ आली असल्याचे सांगत, पेपरफुटी रोखण्यासाठी कायमस्वरूपी आणि कठोर यंत्रणा उभारावी, दोषींना कठोर शिक्षा द्यावी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळू नये, अशी मागणी पांडुरंग देविदास जाधव यांनी केली. शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास टिकवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

0 Comments