Hot Posts

6/recent/ticker-posts

पीक विमा भरूनही नुकसानभरपाई नाही; खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा

"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी मात्र कंगाल"; पांडुरंग जाधव यांची सरकारकडे कारवाईची मागणी


खुलताबाद, २० जुलै २०२६ : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक संकटामुळे खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसान भरून निघावे या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरला होता. मात्र, नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

खुलताबाद तालुक्यातील ममनापुर येथील शेतकरी पांडुरंग जाधव यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक विमा भरला, मात्र पदरी निराशाच आली. नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्यांकडून कोणताही मोबदला मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची लूट होत असल्याची भावना ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.

पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून नियमितपणे प्रीमियम वसूल केला जातो. मात्र, नुकसानभरपाई देण्याच्या वेळी विविध कारणे पुढे करून दावे नाकारले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे "विमा कंपन्या मालामाल, शेतकरी मात्र कंगाल" अशी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले. शासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांची चौकशी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने नुकसानभरपाई जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना जर प्रत्यक्षात त्यांच्याच अडचणी वाढवत असेल, तर अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पीक विमा भरूनही नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा अशा पीक विमा कंपन्या बंद करण्याचा विचार करावा, अशी मागणी शेतकरी पांडुरंग जाधव यांनी केली असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments