_ सात वर्षांपासून कारवाईचा अभाव; पावसाळ्यात वाढला धोका, पालकांमध्ये संताप
खुलताबाद, २६ जुन २०२६ : एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथील जिल्हा परिषद शाळेत नव्या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
सन २०१७-१८ मध्ये झालेल्या वादळी पाऊस व वाऱ्यामुळे शाळेच्या जीर्ण वर्गखोलीच्या व्हरांड्याचे खांब कोसळले होते. त्या वेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, त्यानंतर तब्बल सात वर्षे उलटूनही संबंधित वर्गखोलीचा स्लॅब लोबकळत असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ही धोकादायक इमारत पाडण्यास प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
• कागदी घोड्यातच अडकली परवानगी
घटनेनंतर तत्कालीन गटविकास अधिकारी मोकाटे यांनी शाळेला भेट देऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे व आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार विविध अहवाल व प्रस्तावही पाठविण्यात आले. मात्र, त्यानंतरचा सर्व पत्रव्यवहार केवळ कागदोपत्रीच राहिला असून, धोकादायक वर्गखोली पाडण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
• शाळा सुटल्यानंतरही मुलांचा वावर
धोकादायक वर्गखोलीच्या परिसरात दिवसभर विद्यार्थ्यांचा वावर असतो. तसेच अंगणवाडी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यासाठी याच परिसरातून जावे लागते. शाळा सुटल्यानंतरही अनेक मुले शाळेच्या आवारात खेळत असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय परिसरात वारंवार साप व विंचू आढळत असल्याने विद्यार्थ्यांसमोर आणखी एक धोका निर्माण झाला आहे.
• पदाधिकाऱ्यांची भूमिका.....
१) प्रतिक्षा कापसे (जि.प. सदस्य) :
"येणाऱ्या जिल्हा परिषद बैठकीत या धोकादायक वर्गखोलीचा प्रश्न मांडणार असून, ती पाडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे."
२) सुरेश जाधव (पंचायत समिती सदस्य) :
"सदर वर्गखोली अत्यंत धोकादायक आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, आवश्यक परवानग्या मिळताच माझ्या निधीतून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल."
३) हारुण पटेल (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष) :
"पावसाळा सुरू असल्याने ही वर्गखोली कधीही कोसळू शकते. प्रशासनाने विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा."
४) आशाबाई चव्हाण (मुख्याध्यापिका) :
"धोकादायक वर्गखोलीबाबत शिक्षण विभागाने दिलेली ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे."

0 Comments