भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; ८,९१९ जनावरांचे आरोग्य धोक्यात

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, २६ जुन २०२६ : खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथील श्रेणी-१ पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता, सुसज्ज इमारतीचा अभाव आणि अपुऱ्या सोई-सुविधांमुळे रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील सहा गावांतील तब्बल ८,९१९ जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय सेवेवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

टाकळी राजेराय, लामणगाव, म्हैसमाळ, अब्दुलपूर, विरमगाव आणि जमालवाडी या गावांतील पशुधनासाठी गेल्या ३० ते ४० वर्षांपासून येथे श्रेणी-१ चे पशुवैद्यकीय रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, आजतागायत रुग्णालयाची स्वतःची इमारत उभारण्यात आलेली नाही. दीड वर्षांपूर्वीपर्यंत हे रुग्णालय गिरजा दूध संस्थेच्या इमारतीत सुरू होते. ती इमारत धोकादायक झाल्यानंतर सध्या ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत रुग्णालय हलविण्यात आले आहे. या इमारतीतही ग्रामपंचायतीचे साहित्य असल्याने आडवे पडदे लावून कामकाज सुरू ठेवावे लागत आहे.

या परिसरातील बहुतांश शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करतात, तर अनेकांनी तो प्रमुख व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. मात्र, जनावरांचे वाढते पालनपोषण खर्च, खाद्याचे वाढलेले दर आणि त्यातच शासकीय रुग्णालयात पूर्णवेळ सेवा उपलब्ध नसल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांना बोलवावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून दुग्धव्यवसाय अधिकच तोट्यात जात असल्याची खंत पशुपालकांनी व्यक्त केली.

सन २०२४ च्या पुनर्रचनेनुसार या रुग्णालयात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि बहुउद्देशीय कर्मचारी अशी तीन पदे मंजूर आहेत. यापैकी बहुउद्देशीय कर्मचाऱ्याचे पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षक यांची जिल्हा पशुधन उपायुक्त कार्यालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली असून पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे संपूर्ण खुलताबाद तालुक्याच्या विस्तार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे रुग्णालयात पूर्णवेळ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


• २०१९ च्या विसाव्या पशुगणनेनुसार रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील पशुधन संख्या :


गाई – २,८६१

म्हशी – १,५३७

शेळ्या – ४,१२०

मेंढ्या – ४०१

एकूण – ८,९१९ जनावरे


यामुळे टाकळी राजेराय येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ, सुसज्ज इमारत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांनी जिल्हा परिषद सदस्यांकडे केली आहे.


• पदाधिकारी काय म्हणाले...

"या परिसरातील बहुतांश शेतकरी दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. जनावरांना वेळेत आरोग्यसेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. टाकळी राजेराय येथे सुसज्ज इमारत आणि पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करण्यात येईल."

                   __ प्रतिक्षा कापसे (जिल्हा परिषद सदस्य)


"माझ्याकडे पशुधन विकास अधिकारी पदासह संपूर्ण तालुक्याच्या विस्तार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लक्ष द्यावे लागते. उपलब्ध मनुष्यबळात शक्य तितकी सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे."

               __विजय थोरात (पशुधन विकास अधिकारी) :

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर