Hot Posts

6/recent/ticker-posts

दहीहंडी विश्वविक्रमावर मोठा वाद – जय जवानचा इतिहास पुसला जातोय?

वृत्तांकन: संदिप कसालकर (संपादक, भारत २४ तास)

दहा थरांचा विक्रम… पण गिनीजमध्ये नाव फक्त एकाचं!

जय जवान गोविंदा पथकाचा संताप – “कुठेतरी पाणी मुरतंय!”

मुंबई : एकीकडे ‘कोकण नगरचा राजा’ या दहीहंडी पथकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र मिळालं आहे. तर दुसरीकडे ‘जय जवान गोविंदा पथक’ाने तब्बल तीनदा दहा थर रचूनही आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत व्यक्त केली आहे. प्रश्न असा – विक्रम करणारे दोन पथक, पण गिनीजच्या इतिहासात नाव फक्त एकाचं का?

दहीहंडी २०२५ च्या दिवशी, मुंबईच्या विविध ठिकाणी दोन पथकांनी एकाच दिवशी विश्वविक्रम रचला. ‘कोकण नगरचा राजा’ने एकदा दहा थर रचले, तर जय जवान पथकाने दिवसभरात तब्बल तीन वेळा दहा थरांची कामगिरी केली. मात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली ती केवळ कोकण नगरची.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ‘कोकण नगरचा राजा’ पथकाने 10 थर रचले होते. या विक्रमाची अधिकृत दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली असून, सिद्धिविनायक मंदिरात या पथकाला प्रमाणपत्र देण्यात आलं. पण जय जवान पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

“आम्ही तीनदा 10 थर रचले. पण आमच्या पथकाकडे कुणी लक्षच दिलं नाही. निकष काय होते हेही स्पष्ट सांगितलं जात नाही. आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसतंय,” असा थेट आरोप ढवळे यांनी केला.

जय जवान पथकाकडून दावा करण्यात आला आहे की, गिनीजकडून अधिकृत ई-मेल संवाद त्यांच्याकडे आहे. म्हणजेच त्यांचा विक्रम हा केवळ स्थानिक घोषणेपुरता मर्यादित नव्हता, तर औपचारिक प्रक्रियेत आधीपासून नोंदवलेला होता. त्यामुळे केवळ एका पथकालाच मान्यता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“दोन्ही पथकांनी त्याच दिवशी, तोच पराक्रम केला. मग मान्यता का फक्त एकाला? इतिहास अपूर्ण राहू नये. निर्णय पुराव्याच्या, गुणवत्तेच्या आणि न्यायाच्या आधारेच घ्यावा,” अशी मागणी जय जवान पथकाने केली आहे.

या वादामुळे दहीहंडी विश्वविक्रमाच्या प्रामाणिकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून या प्रकरणात कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कारण, टाळ्या क्षणिक असतात... पण न्याय कायमस्वरूपी ठसा उमटवतो!

Post a Comment

0 Comments