Hot Posts

6/recent/ticker-posts

बोर्टा–शिरताळा रस्त्यावरील रपट्याने घेतला शेतकऱ्यांचा श्वास!


अपुरा निचरा, हजारो एकर शेती पाण्याखाली; सरपंच सावळेंचा आमरण उपोषणाचा इशारा

वृत्तांकन: प्रतीक कुर्हेकर (मूर्तिजापूर)

 बोर्टा फाटा–शिरताळा मार्गावरील गट क्रमांक ९३ जवळ बांधण्यात आलेला रपटा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातील काटा ठरत आहे. कारण, कमी व्यासाच्या एकाच पायलीमुळे मुसळधार पावसाचे पाणी वाहून न जाता थेट शेतात घुसले. परिणामी गट क्रमांक ८८ ते ९३ या संपूर्ण पट्ट्यातील तुरी, उडीद, मूग, कापूस, सोयाबीन यांसह शेकडो एकर शेतीची पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थ आक्रोशित झाले आहेत.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, रपट्यावर एकच पायली टाकल्याने निचऱ्याचा मार्ग अपुरा ठरला. तीन किलोमीटरवरून येणारं पाणी अडकल्याने पिके अक्षरशः गाडली गेली. या संदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांसोबतच बोर्टा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज सावळे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

“एकाच पायलीमुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा घाम मातीमोल होत आहे. पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, तसेच रपट्यावर दोन पायल्या टाकून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. अन्यथा आम्हाला आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही,”
पंकज सावळे, सरपंच बोर्टा

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्यास या प्रश्नाचं आंदोलनात रूपांतर होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाकडे खिळले आहेत. प्रश्न फक्त पिकांच्या नुकसानीचा नाही, तर उद्याच्या उदरनिर्वाहाचा आहे.

Post a Comment

0 Comments