Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षणातील समर्पणाला राज्यस्तरीय सन्मान — संध्या सावंत यांचा भव्य सत्कार!


वृत्तांकन: संदिप कसालकर (संपादक)

शिक्षक म्हणजे समाजाचा खरा दिशादर्शक! आणि याच प्रकाशवाटेवर वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर शाळेतील शिक्षिका संध्या सावंत यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ मिळाल्याने आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे.


या अभिमानास्पद यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी शाळेत दिमाखदार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका नेत्रा दळवी यांनी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मनापासून स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी विनोद कदम यांच्या हस्ते संध्या सावंत यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणात कदम म्हणाले, "सावंत मॅडमनी महापौर पुरस्कारानंतर आता राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून आमच्या शिक्षण क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. पुढील लक्ष्य राष्ट्रीय पुरस्कार असावे!"


या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी शिक्षकवर्गाच्या योगदानाचे कौतुक करत, “संस्था नेहमीच चांगल्या कार्याला पाठबळ देईल,” असे आश्वासन दिले.

आपल्या मनोगतात संध्या सावंत मॅडमनी संस्थेप्रती, सहकाऱ्यांप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, संस्थेला 21,001 ची देणगी दिली.

प्रास्ताविक जितेंद्र पवार यांनी केले, सूत्रसंचालन विशाखा तांबे यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहल देसाई यांनी केले.

या कार्यक्रमास शिक्षण विभागातील अधिकारी माधुरी महाजन, निशा यादव, निरीक्षक भारती भवारी, तसेच अनेक मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हा सत्कार सोहळा केवळ एका शिक्षिकेच्या यशाचा नव्हे, तर प्रत्येक शिक्षकाच्या परिश्रमाचा गौरव होता — शिक्षणाच्या या उज्ज्वल प्रवासाला सलाम!


Post a Comment

0 Comments