Hot Posts

6/recent/ticker-posts

मानखुर्दच्या विद्यार्थ्यांनी उंचावली शाळेची शान – विज्ञान जगतातून मिळाला थेट गौरव!


मुंबईच्या मानखुर्द भागातील नूतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा एस.एस.सी. परीक्षेत 100% निकालाची कामगिरी करत शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला खऱ्या अर्थानं सुवर्णस्पर्श दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचा उत्सव म्हणजे केवळ सन्मान समारंभ नव्हता, तर एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात होती—जिथं देशाचे सर्वोच्च वैज्ञानिक आणि शैक्षणिक मानकरी त्यांचा अभिमानाने गौरव करत होते.

शनिवार, 26 जुलै रोजी नूतन विद्यामंदिर, मानखुर्द या शाळेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष ए. के. मोहंती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर डीसीएसईएमचे संचालक के. महापात्रा आणि विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक अर्णव भट्टाचार्य यांनी विशेष उपस्थिती लावली.

विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना डॉ. ए. के. मोहंती यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेड्या वृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी 100% निकालाबद्दल शाळेचे विशेष अभिनंदन करत उत्तम नियोजनाबद्दलही गौरवोद्गार काढले.

के. महापात्रा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून उत्तम नागरिक होण्याचा सल्ला दिला. “तुमची ही पिढी भारताची शान आहे आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवेल,” असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अर्णव भट्टाचार्य यांनी नूतन विद्यामंदिरचा गौरव ‘दीपस्तंभ’ म्हणत केला. शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअर घडवण्याचे आवाहन केले आणि 100% निकाल ही सुवर्ण महोत्सव वर्षातील एक ‘सुवर्ण भेट’ असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र हटवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजय आहेर यांनी करून दिला. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आशालता पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.

तिन्ही भाषांचा समतोल साधत संगीता पंदीलवार आणि सरिता आवारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला.

हा गौरव विद्यार्थ्यांना नव्या यशाच्या वाटा खुल्या करणारा ठरला—शिक्षणाच्या दीपस्तंभापासून उजळत चाललेल्या भविष्यासाठी.

Post a Comment

0 Comments