वृत्तांकन: चंद्रशेखर क्षीरसागर
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा चांगलीच गाजली – आणि या वेळी ती रस्त्यावर थेट पंगती बसवून! इस्लामपूरच्या आंबेडकर नाका परिसरात प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या चक्काजाम आंदोलनात शेतकरी, कामगार, मजूर आणि दिव्यांग बांधवांनी ठिय्या मांडला आणि राज्य सरकारला खडसावत स्पष्ट इशारा दिला – "कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही!"
प्रहारचे संस्थापक व माजी आमदार बच्चू कडू यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलकांनी रस्त्याच्या मधोमध बसून चक्क जेवणही घेतले, जे सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय बनले.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, मराठी शाळा वाचवा, कामगारांना हक्क द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प केली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व वाहनांना थांबवण्यात आले. परिणामी, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख दिग्विजय पाटील, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे रामदास कोळी, स्वाती भस्मे, प्रदीप माने, कल्पना दबडे, सूर्यकांत सुतार, प्रमोद कुंभार, बबन जाधव, नाना येडगे, रायसिंग पाटील, प्रतीक पाटील आदींचा सक्रीय सहभाग होता. वाळवा, शिराळा व अन्य तालुक्यांमधील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिग्विजय पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास हे आंदोलन थांबणार नाही. हे आमचं शेवटचं नव्हे, तर सुरुवातीचं पाऊल आहे!"
विशेष:
या आंदोलनाचं एक वेगळंच दृश्य म्हणजे – रस्त्यावरच आंदोलकांनी पंगती बसवून जेवण केलं! शिस्तबद्ध, शांततापूर्ण पण ठाम असा विरोध नोंदवत त्यांनी सरकारसमोर प्रश्न उभा केला – "आमच्या हक्काचं कर्जमाफ करा, नाहीतर रस्त्यावरच राहू!"
0 Comments