विशेष प्रतिनिधी
मुंबईतील रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या वतीने, रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेने शिक्षण, प्रयत्नशीलता आणि सामाजिक योगदानाला प्रतिष्ठेने उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, सल्लागार, उत्कर्ष समितीचे अध्यक्ष आणि माजी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सरचिटणीस यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत, गुणवंतांचा गौरव करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
या सोहळ्यात ३५ विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय, समाजातील ९ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सन्मानार्थींनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत भविष्यातील सहभागाची हमी दिली.
समाज उत्कर्ष समितीचे अध्यक्ष यांनी सर्व सदस्यांनी संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा व विधायक सूचना द्याव्यात असे आवाहन केले. कार्याध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “हे मिळालेले यश ही केवळ सुरुवात आहे. यशाचा खरा टप्पा अजून पुढे आहे.” त्यांनी बुद्धीबळ विश्वविजेती दिव्या देशमुख हिचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना मोठ्या स्वप्नांची दिशा दाखवली.
अध्यक्षांनी आपल्या भाषणात संस्थेला बळकट बनवणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. तसेच आर्थिक दृष्ट्या संस्थेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी सर्व सदस्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुसूत्र संचालन संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी केले. मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर यांनी केले. यावेळी उपकार्याध्यक्ष, खजिनदार, सचिव, सहखजिनदार व कार्यकारिणी सदस्य मंचावर उपस्थित होते. त्यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे व सदस्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित प्रत्येकासाठी हा सोहळा प्रेरणा देणारा ठरला.
0 Comments