Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमान्य गणेश विसर्जन स्थळी अतिक्रमणाचा डाव? आमदार अनंत नर यांचा आरोप!

लोकमान्य गणेश विसर्जन तलाव, श्यामनगर येथे दरवर्षी हजारो गणेशमूर्तींचं विसर्जन होतं. विसर्जनावेळी इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या प्रांगणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत निरोपाची आरती होते. पण यंदा या पवित्र स्थळी मोठमोठे खड्डे पाडण्यात आल्याने विसर्जनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक गणेशभक्त या खड्ड्यांमध्ये अडकले आणि मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांना कसरत करावी लागली.

या पार्श्वभूमीवर आमदार अनंत नर म्हणाले की, “हा प्रकार भक्तांची आस्था धोक्यात घालणारा असून सहन केला जाणार नाही. महानगरपालिकेचा अधिकारी वर्ग घटनास्थळी असतानाही त्यांनी दुर्लक्ष केलं, तर म्हाडा स्लम बोर्डानं हे काम आपलं नसल्याचं सांगितलं. मनपानंही हात झटकले." आमदार अनंत नर यांनी संताप व्यक्त करत सांगितलं की, “मनपा आणि म्हाडा जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत, पण भक्तांचा जीव मात्र खड्ड्यात अडकतोय.”

संपूर्ण मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने खड्डे बुजावण्याचं काम सुरू असताना, श्यामनगर तलावावर मात्र खड्डे पाडले जात असल्याचं निदर्शनास आलं. आमदार अनंत नर यांनी प्रश्न उपस्थित केला की, “हे भक्तांची गैरसोय करण्याचं कृत्य आहे की मग या तलावावरील मोकळी जागा बळकावण्याचा डाव?”

हा प्रकार सलग तिसऱ्यांदा प्रकाशझोतात आला आहे. याबाबत आमदार अनंत नर यांनी इशारा दिला की, “लोकमान्य गणेश विसर्जन तलावावर भक्तांची फसवणूक सुरू आहे. हे अतिक्रमण तातडीने थांबवलं नाही, तर आम्ही मोठं आंदोलन उभारू.” शेवटी आमदार अनंत नर यांनी ठाम सवाल उपस्थित केला – “गणेशोत्सवात भक्तांची आस्था धोक्यात घालून कोणाचं हित साधलं जातंय? अधिकारी तातडीने याचा खुलासा करणार आहेत का?”

दरम्यान, या विषयावर शिवसेना शिंदे गटाचे अनिल म्हसकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं –

“या मागे विचार नसून विचारांच्या विकृतीचे राजकारण दिसते आहे. वास्तविक या ठिकाणी ऊन,वारा,पाऊस या पासून भक्तांचे संरक्षना बरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले यांच्या एकंदरीत चांगल्या गोष्टीसाठी या ठिकाणी कायम स्वरुपी शेडची सुविधा कार्यसम्राट लोकप्रतिनिधी श्रीमान वायकर साहेब करून देत आहे त्यात कोणताही राजकीय हेतू नाही ती सुविधा आहे.आणि त्या ठिकाणी काम हे गणेशोत्सवाच्या अगोदर पासून सुरू आहे त्यास जोगेश्वरीतील संतुष्ट जनता साक्षीदार आहे.भक्तांना त्रास होईल असे कोणतेही काम गेल्या अनेक वर्षात झाले नाही आणि होणार ही नाही.
मात्र अनेक ठिकाणी विकास कामे सुरू असल्याने आपल्याकडून अशा कामांना योगच येत नसल्याने कदाचित विरोधकांचा या सेवा भावी कामाविषयी आकस असावा असे स्पष्ट दिसते आहे.
मला वाटते आपण स्वतः काही तरी नवीन निर्माण करून दिलासा देण्याऐवजी अशा कामांना जाणून बुजून गैरसमज पसरविणे निश्चितच भूषणवाह नाही.
जनतेस काहीतरी नवीन सुविधा द्या ते स्वागत करतील. चांगला वेळ आणि संधी मिळाली असेल तर त्याचा कोळसा करू नका...”

Post a Comment

0 Comments