खुलताबाद,जि. छ.संभाजीनगर,दि. २२ : इनामी जमिनी संदर्भातील शासनाच्या परिपत्रकांमधील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी करता येत नसून विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करत खुलताबाद तालुक्यातील बोडखा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत महसूलमंत्री तथा मुख्य सचिव यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे इनामी जमिनींच्या संदर्भातील अटी शिथिल करून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहा अरफत वजीर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांनुसार पूर्वी भोगवटादार तक्त्यात असलेली अनेक नावे कमी करून ती इतर अधिकार तक्त्यात वर्ग करण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष अनेक वर्षांपासून इनामी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर दिसत नसल्याने त्यांना जमीनधारक म्हणून विविध योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
सध्या राज्य शासनाने कृषी क्षेत्रातील माहितीचे डिजिटल एकत्रीकरण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य केली आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे इनामी जमीन कसणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची नोंदणी होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी पीकविमा, कृषी अनुदान, विविध शेतकरी कल्याणकारी योजना तसेच इतर शासकीय लाभांपासून हे शेतकरी वंचित राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने विविध योजना राबवत असले तरी इनामी जमिनी संदर्भातील आदेश आणि परिपत्रकांमुळे प्रत्यक्ष जमीन कसणारा शेतकरीच लाभापासून दूर राहत आहे. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार शेती आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची आर्थिक व मानसिक परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.
तसेच सन २०१६ पासून सुरू असलेल्या वसुली प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने विशेष समिती गठित करावी, इनामी जमिनींच्या नोंदींचा पुनर्विचार करावा आणि प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याबाबत योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.शेतकरी हिताच्या दृष्टीने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून अॅग्रीस्टॅक नोंदणीतील अडथळे दूर करावेत तसेच इनामी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर शेतकरी शाहरुख शाह, नूर शाह, अयूब शाह, बशीर शाह, अनवर शाह, मकसूद शाह, बिलाल शाह, नवाब शाह, अनीस शाह, मुबारक शाह, महेताब शाह, जावेद शाह, मोहसिन शाह यांच्यासह बोडखा येथील अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी शासनाने इनामी जमिनी संदर्भातील जाचक अटी शिथिल करून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी कन्नड, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती अरफात शाह यांनी दिली.

0 Comments