मिरा रोडमध्ये सुरू झालेल्या मराठी-अमराठी वादाला आता अधिक धार मिळाली आहे. अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्च्यानंतर मराठी संघटनांनी अस्मिता मोर्चा काढून प्रत्युत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मिरा रोडला भेट देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मनसेचा मेगा प्लॅन
मराठी अस्मितेवर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून, राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग ही या चळवळीला नवी दिशा देऊ शकतो. येत्या महापालिका निवडणुका लक्षात घेता, हा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता आहे.
मनसैनिकांचा आक्रमक मोर्चा
मिरा रोड-भाईंदर परिसरात मनसे, ठाकरे गटाची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने संयुक्त मोर्चा काढला. सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारताच, मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटेपासून ताब्यात घेण्यात आलं. मात्र दिवसभर सुरू असलेल्या दबावानंतर पोलिसांनी अखेर मोर्चाला परवानगी दिली.
मराठी-अमराठी संघर्ष तीव्र
29 जून रोजी एका दुकानदाराला मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात मारण्यात आली. त्यानंतर 3 जुलै रोजी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या मोर्चात मराठी विरोधी भाषणं झाल्याचा आरोप आहे.
भाजप खासदाराची वादग्रस्त प्रतिक्रिया
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी "मराठी माणूस आमच्या पैशावर जगतो" आणि "महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, आपटून आपटून मारू" अशी वादग्रस्त वक्तव्यं केल्याने मराठी जनतेत संताप उसळला. यालाच उत्तर म्हणून मिरा रोडमध्ये मराठी लोकांनी मनसेच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
0 Comments