मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

वर्ष उलटले, २ कोटींचा रस्ता कागदावरच; खुलताबाद तालुक्यातील 'त्या' दोन्ही गावांचा संपर्क तुटला!

अक्षर आकार:

खुलताबाद प्रतिनिधी : सलमान फय्याज खान

एकीकडे राज्य सरकार ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करत असताना, दुसरीकडे खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय आणि विरमगाव या दोन गावांची अवस्था 'दिवाळे निघाल्यासारखी' झाली आहे. या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी तब्बल २ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, आमदारांच्या हस्ते उद्घाटनाचा जंगी सोहळाही पार पडला, रस्त्यावर तसा फलकही लागला... पण वर्ष उलटूनही प्रत्यक्ष रस्त्यावर मातीचा एक खडाही पडलेला नाही! परिणामी, केवळ ३ किलोमीटरच्या अंतरासाठी ग्रामस्थांना ८ किलोमीटरचा नरकयातनादायी फेरा मारावा लागत आहे.

दहा वर्षांपूर्वीपर्यंत विरमगावच्या नागरिकांचे संपूर्ण जीवन टाकळी गावावर अवलंबून होते. किराणा सामान, शेतीचे बि-बियाणे, बँक व्यवहार, लग्नबस्ते आणि आठवडी बाजार यासाठी टाकळी हेच सर्वात सोयीचे गाव होते. मात्र, रस्त्याची एवढी भीषण दुरवस्था झाली आहे की, पावसाळा तर दूरच, पण उन्हाळ्यातही या रस्त्यावरून दुचाकी चालवणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी या मार्गाने जाणेच सोडून दिले आहे.

विरमगाव येथे केवळ प्राथमिक शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी टाकळी येथील प्रशालेत जात असत. मात्र, रस्त्यावरून पायी चालणेही अशक्य झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना सक्तीने बाजार सांवगी, गदाणा आणि इतर दूरच्या ठिकाणी पाठवण्यास सुरुवात केली आहे. रस्ता नसल्याच्या या शासकीय नाकर्तेपणामुळे गरीब पालकांना महिन्याला २ ते ४ हजार रुपयांचा नाहक आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते २ कोटी २५ लाखांच्या या कामाचा मोठा गाजावाजा करत शुभारंभ करण्यात आला होता. रस्त्यावर तसा उद्घाटनाचा बोर्डही दिमाखात उभा आहे. मात्र, हा फलक लागून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी कामाची एक वीटही रचली गेलेली नाही. "लोकप्रतिनिधींना फक्त फलक लावून मते मागण्यात रस आहे का?" असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.


"आम्ही शेती करायची की नाही?"

"वकिली व्यवसायासोबत आम्ही शेतीही करतो. पण शेतात जाण्यासाठी उन्हाळ्यातच रस्ता नसेल, तर पावसाळ्याची कल्पनाच न केलेली बरी. प्रशासनाने सांगावे, आम्ही आमच्या शेती काय पडीक ठेवायच्या का?"

— अ‍ॅड. मोईन पटेल (शेतकरी व वकील, टाकळी)


"आमदारांना ईमेल केले, पण उपयोग शून्य!"

"विरमगावच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी टाकळी गाव अत्यंत महत्त्वाचे आहे. या रस्त्यासाठी आम्ही आमदार बंब यांना ईमेलद्वारेही संपर्क केला, पण काहीच फायदा झाला नाही. प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे वृद्ध महिला आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत."

— चंद्रकांत गोरे (ग्रामपंचायत सदस्य, विरमगाव)
...आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेहमीचे 'रडगाणे'!


"ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे..."

"संबंधित ठेकेदाराला आम्ही नोटीस बजावली असून तो लवकरच काम सुरू करणार आहे. पावसाळ्यात रस्त्याचे खडीकरण केले जाईल आणि पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरण पूर्ण करण्यात येईल."

— सौरभ चव्हाण (कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)

थोडक्यात काय तर, कागदावर आणि फ्लेक्स बोर्डवर 'डिजिटल' झालेला रस्ता प्रत्यक्षात कधी उतरणार आणि विरमगाव-टाकळीच्या ग्रामस्थांची या चक्रव्ह्यूहातून कधी सुटका होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)