भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

पैगंबर मोहम्मद (स.अ) यांच्या कथित अवमानप्रकरणी नाझिया इलाही खान विरोधात कारवाईची मागणी, मुस्लिम समाजाची खुलताबाद पोलीसांत तक्रार

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!



खुलताबाद, २२ जुन २०२६ : इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद (स.अ) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्ये करून देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत खुलताबाद शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने कथित नाझिया इलाही खान यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी रात्री मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने खुलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची भेट घेत निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चांमध्ये नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद (स.अ) यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्ये केली असून त्यामुळे देशभरातील मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या जात आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होत असून मुस्लिम समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मौलाना तौहीद आणि माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पैगंबर मोहम्मद (स.) हे संपूर्ण मुस्लिम समाजासाठी अत्यंत आदरणीय असून त्यांच्या संदर्भात होणारा कोणताही अवमान मुस्लिम समाज सहन करू शकत नाही. वारंवार अशा प्रकारची विधाने करून काही व्यक्ती जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) लागू असलेल्या कलमान्वये तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच संबंधित वक्तव्ये प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. देश आणि राज्यातील सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, असेही शिष्टमंडळाने म्हटले आहे.दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल, दरगाह कमिटी हद्दे कलांचे अध्यक्ष एजाज अहमद, दरगाह कमिटी हद्दे खुर्दचे अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी, दरगाह हजरत गंज रवा कमिटीचे अध्यक्ष नवाब कमरोद्दीन, नगरसेवक मुनीबोद्दीन, मिर्झा अयाज बेग, तौसीफ अहमद, सलीमोद्दीन, शेख वाजिद, हाजी इकबाल अहमद, हाफिज जावेद, हाफिज अझहर, हाफिज बिलाल, हाफिज एहतेशाम, हाफिज निसार, मौलाना शफीयोद्दीन, हाफिज तौसीफ, इमरान खान, हाफिज उमर फारुख, शेख रियाजोद्दीन, शौकत बावा, अलीमोद्दीन मुजावर यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :

काय आहे मागणी?

- कथित नाझिया इलाही खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा.

- धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी.

- आक्षेपार्ह वक्तव्ये प्रसारित करणाऱ्या माध्यमांची चौकशी करावी.

- समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर