Hot Posts

6/recent/ticker-posts

अजब खुलताबादची गजब कहाणी : १६ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त २६५ घरकुल मंजूर!

 १० एकर वनजमीन उपलब्ध करून देण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पटेल यांचा लढा 


खुलताबाद, जि.छ.संभाजीनगर, २२ जुन : ऐतिहासिक व पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुलताबाद शहराची लोकसंख्या १६ हजारांहून अधिक असतानाही प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ २६५ घरकुलांना मंजुरी मिळाल्याने शेकडो बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे अद्यापही स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पटेल यांनी वन विभाग व नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन घरकुल योजनेसाठी १० एकर वनजमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना सादर केलेल्या निवेदनात पटेल यांनी नमूद केले आहे की, खुलताबाद शहरातील अनेक पात्र लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून केवळ जमिनीच्या अभावामुळे प्रलंबित आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी आवास योजनेचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

निवेदनानुसार, म्हैसमाळ रोडवरील डॉ. झाकीर हुसेन बी.एड. महाविद्यालयासमोरील वन विभागाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा घरकुल प्रकल्पासाठी योग्य ठरू शकते. या परिसरातील सुमारे १० एकर जमीन घरकुल योजनेसाठी उपलब्ध करून दिल्यास बेघर कुटुंबांना कायमस्वरूपी निवारा मिळू शकतो, असे पटेल यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनाही स्वतंत्र निवेदन देण्यात आले असून, वन विभागाशी समन्वय साधून संयुक्त पाहणी करावी तसेच आवश्यक पत्रव्यवहार करून जमीन उपलब्धतेची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित घरकुल वसाहतीला भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे.इकबाल पटेल यांनी इशारा दिला आहे की, पुढील ३० दिवसांत या विषयावर ठोस कार्यवाही न झाल्यास प्रधानमंत्री कार्यालय, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या वन विभागाकडे हा प्रश्न मांडण्यात येईल.

खुलताबादसारख्या १६ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ २६५ घरकुलांना मंजुरी मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या जमिनीच्या समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. खासगी जमीन उपलब्ध नसल्यास शासन नियमांनुसार गायरान जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे खुलताबादमधील घरकुलासाठी जमीन उपलब्धतेचा प्रश्न प्रशासनासाठी प्राधान्याचा विषय ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments