खुलताबाद २४ जुन २०२६ - इस्लाम धर्म, पवित्र कुराण आणि पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाझिया इलाही खान यांच्याविरोधात स्वप्रेरणेने (सोमोटो) कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खुलताबाद येथील सामाजिक कार्यकर्ते इकबाल पटेल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी (ता.२४) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे मुख्य उप सचिव, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ११ जून २०२६ रोजी युट्यूबवरील दिव्या सिंह यांच्या पॉडकास्टमध्ये नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्म, पैगंबर मोहम्मद (स.अ.) आणि इस्लामी इतिहासासंदर्भात कथितरीत्या आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केली. संबंधित व्हिडिओ युट्यूब, इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित झाल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.या वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची तसेच सामाजिक सलोखा व शांतता बिघडण्याची शक्यता असल्याचे इकबाल पटेल यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे विविध समाजघटकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यापूर्वीही धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांबाबत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करत इकबाल पटेल यांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी तहसीलदार, खुलताबाद यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर २३ डिसेंबर २०२४ रोजी तहसीलदार कार्यालयामार्फत सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. पुढे १६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने हे प्रकरण उपसचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठविल्याचा उल्लेखही सद्य निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात नाझिया इलाही खान यांचा कोलकाता येथील कार्यालयीन व निवासी पत्त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ, सोशल मीडियावरील सामग्री व उपलब्ध कागदपत्रांची सखोल चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात स्वप्रेरणेने दखल घेऊन आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खुलताबाद पोलिस ठाण्यास आवश्यक आदेश देण्यात यावेत तसेच संबंधित सामग्रीची तपासणी करून नाझिया खान विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी इकबाल पटेल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या निवेदनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments