भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

दिल्लीत गोळेगावच्या जलसंधारण कार्याचा राष्ट्रीय गौरव; ‘वॉटरशेड योद्धा’ मालिकेसाठी संतोष जोशी यांची निवड

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
जॉईन व्हा



खुलताबाद जि. छ.संभाजीनगर (11 जुन 2026) 

खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव गावाने जलसंधारण आणि पाणलोट विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागातर्फे तयार करण्यात येत असलेल्या ‘वॉटरशेड योद्धा’ या विशेष चित्रफीत मालिकेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संतोष बाळकृष्ण जोशी (गोळेगाव) यांची निवड करण्यात आली आहे.

या मालिकेचे चित्रीकरण नोएडा (दिल्ली) येथे पार पडले असून, प्रसिद्ध अभिनेते अनूप सोनी यांनी संतोष जोशी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गोळेगाव ग्रामस्थांची एकजूट, लोकसहभागातून उभारलेले पाणलोट विकासाचे विविध उपक्रम, जलसंधारणासाठी केलेले व्यापक काम आणि त्यातून गावात घडलेले सकारात्मक परिवर्तन याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

ही मालिका लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतासह जगभर प्रदर्शित होणार असून, पाणी, पर्यावरण आणि मृदसंवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संतोष जोशी यांनी व्यक्त केला.

मुलाखतीनंतर विविध राज्यांतील प्रतिनिधींनी गोळेगावच्या कार्याची प्रशंसा करत आपल्या गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारण चळवळ उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यामुळे गोळेगावच्या मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे चित्र दिसून आले.

संतोष जोशी यांनी या यशाचे श्रेय गोळेगावच्या सर्व ग्रामस्थांना, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, संबंधित अधिकारी, कृषी विभाग (खुलताबाद), वाल्मी (छत्रपती संभाजीनगर), पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, एंड्युरन्स कंपनी, सेवक ट्रस्ट, गायत्री परिवार तसेच स्थानिक माध्यमे आणि पत्रकारांना दिले.तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी गोळेगावमध्ये येऊन केलेल्या श्रमदानामुळे गावात नवी ऊर्जा निर्माण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी हा सन्मान त्या सर्वांना समर्पित केला.

यावेळी त्यांनी भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे संयुक्त सचिव नितीन खाडे, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, श्रीमती दीपाली पाटील तसेच संबंधित सर्व अधिकारी व सहकाऱ्यांचे आभार मानले.

“गोळेगावमध्ये लोकसहभागातून उभे राहिलेले जलसंधारणाचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरेल आणि अशा चांगल्या उपक्रमांना भविष्यातही सर्वांचे सहकार्य लाभेल,” असा विश्वास संतोष बाळकृष्ण जोशी यांनी व्यक्त केला. 


BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर