Hot Posts

6/recent/ticker-posts

वेरूळमध्ये पोलिसांच्या मारहाणीत जि.प शिक्षकाचा मृत्यू!; मृतदेह रस्त्यावर ठेवून हजारो नागरिकांचा रास्ता रोको, अंबादास दानवेच्या आक्रमक भूमिकेमुळे 22 तासानंतर गुन्हा दाखल


छत्रपती संभाजीनगर (11 जुन 2026)

पोलीस आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केल्यानेच जिल्हा परिषद शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे (वय ५४, रा. वेरूळ) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिक्षकाची पत्नी आणि नातेवाइकांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वेरूळ लेणी परिसरात बुधवारी (१० जून) रात्री साडेअकराच्या सुमारास एका घराची झाडाझडती घेणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना "तुम्ही कोण आहात?' अशी केवळ चौकशी केली म्हणून अमानुष मारहाण झाल्याचे समोर येत आहे. या हत्येच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांना निलंबित करून अटकेच्या मागणीसाठी आज, ११ जूनला दुपारी ३ ला वेरूळ येथील भोसले चौकात हजारो नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून 'रास्ता रोको' आंदोलन सुरू केले. सायंकाळी ७ वाजता तब्बल ४ तासांनी हे रास्ता रोको आंदोलन ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.



नक्की काय घडलं?

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बोरसे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. बुधवारी रात्री ११:३० वाजता वैजापूर पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस अंमलदार आणि काही खासगी व्यक्ती दोन वाहनांमधून एका फरार आरोपीच्या शोधासाठी वेरूळला आले होते. ते केशव बाबाच्या मठासमोरील एका घरात संशयास्पदरित्या झाडाझडती घेत असतानाच शिक्षक बोरसे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या लहान मुलांना आईस्क्रीम आणण्यासाठी घराबाहेर पडले होते.मठासमोरील गोंधळ पाहून ते थांबले. त्यांनी पोलीस व त्यांच्यासोबतच्या व्यक्तींना "तुम्ही कोण आहात आणि मध्यरात्री काय करताय?,' अशी विचारपूस केली. याचा राग आलेल्या वैजापूरच्या पोलीस उपनिरीक्षकाने आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी "तू कोण विचारणारा?' असे म्हणत शिवीगाळ बेदम मारहाण करायला सुरुवात केली. बोरसे जागीच कोसळले. त्यांना नागरिक, नातेवाइकांनी मध्यरात्रीच आधी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले. मध्यरात्री डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पत्नी अनिता बोरसे, मुलगी प्रेरणा आणि कादंबरी बोरसे यांनी पोलिसांच्या मारहाणीमुळेच सुरेश बोरसे यांचा जीव गेल्याचा आरोप करत पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


अंबादास दानवेच्या आक्रमक भूमिकेमुळे 22 तासानंतर गुन्हा दाखल

शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू झाला असून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी वेरूळ येथे नागरिकांनी चक्का जाम केला होता. शिवसेना उबाठाचे नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत चक्काजाम मध्ये सहभाग घेत न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वेरूळ परिसरात एका आरोपीच्या शोधासाठी दोन पोलिस कर्मचारी आणि फिर्यादी घटनास्थळी गेले होते. संबंधित फिर्यादी हा वाळू माफियाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून हे पथक आले होते. यावेळी रस्त्याने जाणारे शिक्षक सुरेश बोरसे यांनी "काय झाले?" अशी साधी विचारणा केली. मात्र याच कारणावरून त्यांना मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.याप्रकरणी पोलिस अधिकारी यांनी शिक्षकाला मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप होत असून त्यानंतर झालेल्या हल्ल्यात सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कायद्याचे रक्षण करणारेच जर कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments