मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

८ वेळा टेंडर बदलले, २५४ कोटी खर्च झाले, तरीही कामगार रुग्णालय अपूर्णच! खासदारांनी उघड केला अनागोंदी कारभार

अक्षर आकार:

वृत्तांकन: संदिप कसालकर 

मुंबई: अंधेरीतील ज्या कामगार रुग्णालयाने हजारो कामगारांना आरोग्यदायी आयुष्य द्यायला हवे होते, तेच रुग्णालय गेल्या १५ वर्षांपासून 'सिस्टीम'च्या लाल फितीत अडकून स्वतःच 'रुग्ण' बनले आहे! कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही, ८ वेळा टेंडर बदलूनही रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण का झाले नाही? हा संतप्त सवाल करत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे धडाडीचे खासदार रविंद्र वायकर यांनी आता कंबर कसली आहे. "हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी थेट केंद्रीय कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेणार आणि महिनाभरात बदलाची नांदी सुरू करणार," अशी सिंहगर्जना वायकर यांनी केली आहे.

खासदार रविंद्र वायकर यांनी गुरुवारी अंधेरी (पूर्व) येथील या कामगार रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली. केवळ भेटच दिली नाही, तर रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून १५ वर्षांपासून रखडलेल्या कामाचा पाढाच वाचला. यावेळी रुग्णालयाच्या संचालक व अधिष्ठातांनी दिलेल्या माहितीने सर्वांनाच धक्का बसला.

कामाचा बोजवारा आणि चौकशीचा ससेमिरा:

१९८५ मध्ये राज्य सरकारने सुरू केलेले हे रुग्णालय २००८ मध्ये केंद्राकडे वर्ग झाले. १०.७४ एकरची अवाढव्य जागा, १५ विविध विभाग असतानाही २००८ पासून सुरू झालेले नूतनीकरणाचे काम अद्याप अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कामाच्या टेंडरमध्ये तब्बल ८ वेळा बदल करण्यात आला असून, आता या कामाची किंमत २५४ कोटींवर पोहोचली आहे! इतकेच नाही तर, कर्मचारी इमारत आणि अन्य एका इमारतीला केवळ 'ग्राउंड अधिक २' मजल्यांची परवानगी असताना त्या बेकायदेशीरपणे '८ मजली' उभारण्यात आल्या आहेत. परिणामी, या इमारतींना अद्याप 'ताबा प्रमाणपत्र' (OC) मिळालेले नाही. अनेक विभागांची कामे लटकलेली आहेत. या अनागोंदी कारभारामुळेच रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे.

खासदार वायकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, काम सुरू होऊन १५ वर्ष झाली तरी ते अपूर्ण का राहिले? याची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

वायकरांचा 'अॅक्शन प्लॅन' आणि कामगारांना दिलासा:

"कामगारांच्या आरोग्याशी चाललेली ही थट्टा खपवून घेतली जाणार नाही," अशा कडक शब्दात वायकर यांनी प्रशासनाला सुनावले. यावर मार्ग काढण्यासाठी ते लवकरच दिल्लीत केंद्रीय कामगार मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ बैठका न करता, शक्य झाल्यास महिन्याभरात रुग्णालयातील काही महत्त्वाचे विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी रुग्णालय प्रशासन, कर्मचारी आणि कामगारांना दिले आहे.

कर्मचाऱ्यांच्या 'या' ५ प्रमुख मागण्यांवर खासदारांची मोहोर:

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन खासदार वायकरांना दिले, ज्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे:

  1. IPD सेवा त्वरित सुरू करा: अंधेरी कामगार रुग्णालयात आय.पी.डी. (अंतर रुग्ण सेवा) लवकरात लवकर सुरू होऊन कामगारांना भरती होण्याची सुविधा मिळावी.
  2. ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स कार्यान्वित करा: रुग्णालयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे काम ९०% पूर्ण झाले आहे, ते त्वरित सुरू करावे.
  3. रुग्ण कक्षांचा प्रशासकीय वापर थांबवा: मुख्य इमारतीमधील तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील रुग्णसेवेच्या कक्षांचा उपयोग प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या आसन व्यवस्थेसाठी (Offices) केला जाणार आहे. हे त्वरित थांबवून तिथे पुरुष व स्त्री वॉर्ड सुरू करावेत.
  4. इमर्जन्सी सेवा सुरू करा: एक इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर (OT) आणि पाच आयसीयू (ICU) बेड त्वरित सुरू करावेत.
  5. स्टाफ क्वॉर्टर्सची दुरुस्ती व नवीन बांधकाम: जुन्या स्टाफ क्वॉर्टर्सची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच, नवनियुक्त परिचारिका, वैद्यकीय शिक्षक, पॅरामेडिकल आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी नवीन स्टाफ क्वॉर्टर्स बांधण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालय (नवी दिल्ली) / ई.एस.आय.सी मुख्यालयास त्वरित पाठवावा.

थोडक्यात काय, तर खासदार रविंद्र वायकरांच्या या 'अॅक्शन मोड'मुळे अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आता खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' येणार, अशी आशा निर्माण झाली आहे!

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)