Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश, महापालिकेला एक महिन्याची मोहिम राबवण्याचे निर्देश

 


मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार व फुफ्फुसांचे आजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई महानगरपालिकेला सर्व कबुतरखाने बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. महापालिकेने येत्या एक महिन्याच्या आत विशेष मोहीम राबवून हे कबुतरखाने बंद करावेत, तसेच कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांविषयी जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले.

मुंबईत सध्या ५१ कबुतरखाने असून त्यातील काही शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे आहेत. यातील काही कबुतरखाने बंद आहेत, तर काही अजूनही कार्यरत आहेत.

दादर कबुतरखान्यावरही कारवाई होणार?

दादरमधील एक कबुतरखाना ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून संरक्षित आहे. मात्र, हे देखील आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याची ठाम भूमिका मांडत आमदार मनीषा कायंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी सर्व कबुतरखान्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

कबुतरांच्या विष्ठेमुळे मृत्यूचेही प्रकार

सदस्य चित्रा वाघ यांनी सभागृहात सांगितले की, कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या मामीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट करत, यावर ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पालिकेची पूर्वीची कारवाई आणि पुढील योजना

दादरमधील कबुतरखान्याबाबत तक्रारी आल्यावर मुंबई महापालिकेने तो दोन वर्षांसाठी बंद ठेवला होता. त्यानंतर परिसरातील रहिवाशांची समिती स्थापन करून खाणेपिणे टाकणाऱ्यांवर कारवाई, तसेच जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती.

आता या धोरणात अधिक तीव्रतेने अंमलबजावणी होणार असून सर्व कबुतरखाने कायमस्वरूपी बंद होणार आहेत.

Post a Comment

0 Comments