विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर
मालाड पूर्व : गणेशोत्सव मंडळे, स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन शेडचे लोकार्पण खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या हस्ते मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या या शेडमुळे आनंद नगर, आप्पा पाडा येथील मंगलकृपा सोसायटी आणि इंदिरानगर, राणी सती मार्ग येथील ‘मन्नत का राजा’ गणेशोत्सव मंडळाला सुविधा उपलब्ध झाली आहे.
गणेशोत्सवासह वर्षभरातील कार्यक्रमांसाठी सुविधा
मंगलकृपा सोसायटी आणि ‘मन्नत का राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या शेडचा उपयोग गणेशोत्सवाबरोबरच वर्षभर आयोजित होणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी करता येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी, मंडळांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेता या शेडचा उपयोग होणार आहे. यामुळे नागरिकांना कार्यक्रमांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर जागा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक विकासकामांवर भर
नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक परिसराचा विकास करणे यासाठी खासदार निधीतून विविध विकासकामे राबविण्यात येत असल्याचे खासदार रविंद्र वायकर यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि परिसरातील गरजा लक्षात घेऊन भविष्यातही आवश्यक विकासकामांसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
लोकार्पण सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्याला विभागप्रमुख वैभव भरडकर, धनश्री भरडकर, अरुण सुर्वे, शरद वाघ, सुरेश यादव, विजय नाईक, संतोष लाड, मिथुन सिंह यांच्यासह विविध विभागांतील व उपविभागांतील पदाधिकारी, शाखाप्रमुख, पक्षाचे मान्यवर, स्थानिक शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेडची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Comments