खुलताबाद,11 स्पटेंबर 2026 : खुलताबाद तालुक्यात यंदा अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण खुलताबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील गावागावात पाहणी केली असता पावसाअभावी खरीप हंगामातील पिके जळून गेली आहेत. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या वैयक्तिक सिंचन विहीर, गायगोठा व मोहगणी आदी कामांची प्रलंबित कुशल देयके तातडीने अदा करावीत, रात्रीची लोडशेडिंग बंद करावी आणि कमी दाबाचा विद्युत पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण पा. डोणगावकर यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष अॅड. अनिल एस. नलावडे, शहर अध्यक्ष अब्दुल मजीद मणियार, ज्येष्ठ नेते आबिद जहांगीरदार, वीरेंद्र वाघ, शेख तौफीक, नवनाथ नलावडे, प्रमोद निकम, राजाभाऊ राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments