विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर
मुंबई: जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी आणि मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकार्यांसोबत एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. प्रभागांमधील रखडलेले विकासकाम आणि ढासळलेली नागरी सुविधांवर कठोर भूमिका घेत, आमदार अनंत (बाळा) नर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून नागरिकांना त्वरित दिलासा देण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
प्रभाग क्रमांक ७२, ७३, ७४, ७७, ७८ आणि ७९ मधील स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी आयोजित या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त श्री. विश्वास मोटे आणि के/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त कदम यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने चर्चेत आलेल्या प्रमुख नागरी समस्या:
खराब व उखडलेले रस्ते: प्रभागांतर्गत अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा गांभीर्याने मांडण्यात आला.
अपुरा पाणीपुरवठा: अनेक भागांत अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याचे ठरले.
SRA आणि PAP प्रकल्प: झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) प्रकल्प आणि प्रकल्पबाधितांच्या (PAP) पुनर्वसनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
मलनिस्सारण वाहिन्या (Drainage): तुटलेल्या किंवा गळती लागणाऱ्या ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्याची समस्या तातडीने मार्गी लावण्यास सांगण्यात आले.
ऐतिहासिक व सार्वजनिक स्थळे: जोगेश्वरी गुंफा परिसराचा विकास, उद्याने (Gardens), स्मशानभूमी आणि अधिकृत मार्केटच्या सुविधांवर भर देण्यात आला.
मेट्रो व इतर कामे: मेट्रो कामांमुळे निर्माण झालेल्या स्थानिक अडचणींवरही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
प्रमुख उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच महायुती व स्थानिक पातळीवरील अनेक प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक रविंद्र साळवी, नगरसेवक कैलासनाथ पाठक, नगरसेविका लोना रावत, नगरसेविका मानसी जूवाटकर, उपविभाग प्रमुख जयवंत लाड, उपविभाग समन्वयक संदीप कोठारकर, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदकुमार ताम्हणकर तसेच महिला पदाधिकारी उत्तरा नायर, प्रियांका आंधळे, समिक्षा माळी आणि योगित पाटील, संजय सावंत, तुषार सावंत, शैलेष, सलिम, रमातावडे, रतन तावडे, मयूर मोरये आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार अनंत (बाळा) नर यांनी दिलेल्या दणक्यानंतर आता महापालिका प्रशासन जोगेश्वरी पूर्वेतील या समस्या किती वेगाने सोडवते, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
Comments