छत्रपती संभाजीनगर, 8 स्पटेंबर 2026 : दिल्ली येथे महिला पत्रकार शाहीन खान (4PM न्यूज नेटवर्क) आणि नफिसा खान (स्वतंत्र पत्रकार) यांच्यावर झालेल्या कथित हल्ला व मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन, मराठवाडा महाराष्ट्र टीमच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शाहीन खान व नफिसा खान यांच्यासोबत दिल्ली पोलिसांकडून कथितरीत्या झालेल्या मारहाणीची स्वतंत्र, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महिला पत्रकारांशी गैरवर्तन, धमकी अथवा मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
महिला पत्रकारांची प्रतिष्ठा, सन्मान आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. पत्रकारांना वृत्तांकन, आंदोलन, धरणे, घटनास्थळे तसेच शासकीय व सार्वजनिक ठिकाणी निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रभावी सुरक्षा प्रोटोकॉल लागू करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
पत्रकारांवर हल्ला, धमकी, जबरदस्तीने अडवणे, पत्रकारांची उपकरणे हिसकावणे किंवा वृत्तांकनात अडथळा आणण्याच्या तक्रारींवर तातडीने एफआयआर दाखल करून वेळबद्ध चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. पत्रकारांविरुद्ध सूडबुद्धीने किंवा दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने दाखल होणाऱ्या कथित खोट्या गुन्ह्यांच्या उच्चस्तरीय समीक्षेसाठी विशेष देखरेख यंत्रणा स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी व व्यावहारिक पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा, अशी मागणी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी दैनिक औरंगाबाद सिटीजन्सचे संपादक तथा प्रदेश संरक्षक (मराठवाडा) इरशाद कुरेशी, प्रदेशाध्यक्ष (मराठवाडा) मोहम्मद ताबिश, प्रदेश संघटन सचिव सैय्यद अन्वर कादरी, औरंगाबाद टाइम्सचे जिल्हाध्यक्ष कलीमुद्दीन, एडीएन न्यूजचे जेष्ठ पत्रकार हुसेन पटेल, लोकमत समाचारचे पत्रकार सलमान खान, जिल्हा संघटन सचिव सैय्यद जाकीर अहमद, जिल्हा महासचिव अजीम खान यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Comments