मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

गायरान जमीन नियमानुकूल करून सातबाऱ्यावर नावे लावण्याची मागणी

अक्षर आकार:

निरगुडी (ठाकूरवाडी) येथील भूमिहीन अतिक्रमणधारकांचा प्रश्न; पँथर रिपब्लिकन पक्षाचा वन विभागाला आंदोलनाचा इशारा


खुलताबाद, 2 स्पटेंबर 2026 : तालुक्यातील मौजे निरगुडी (ठाकूरवाडी) येथील गायरान जमिनीवर सन १९७८ पासून शेती करणाऱ्या पात्र भूमिहीन अतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क देऊन सातबारा उताऱ्यावर नावे नोंदवावीत, अशी मागणी पँथर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने खुलताबाद येथील वन परीक्षेत्र कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, निरगुडी (ठाकूरवाडी) येथील सर्व्हे क्रमांक ४३ तसेच गट क्रमांक ७० व १५ मधील गायरान जमिनीवर स्थानिक कुटुंबे गेल्या अनेक दशकांपासून शेती करत असून, याच उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. प्रशासनाकडून यापूर्वी अतिक्रमणधारकांच्या जमिनी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

एकूण ३४ भूमिहीन अतिक्रमणधारकांपैकी २७ जणांच्या नावे सातबारा उताऱ्यावर नोंद करून जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित पात्र लाभार्थी तसेच मृत अतिक्रमणधारकांच्या कायदेशीर वारसांच्या नावे अद्याप फेरफार नोंद झालेली नसल्याने ते जमीन हक्कापासून वंचित आहेत.

दरम्यान, या जमिनींसाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या काही मूळ अतिक्रमणधारकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात कायदेशीर वारसदार प्रत्यक्षात त्याच जमिनीवर शेती करत असतानाही कागदोपत्री हक्क न मिळाल्याने त्यांना शासकीय योजना, पीक कर्ज व कृषी अनुदानाचा लाभ घेताना अडचणी येत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

याच परिसरातील काही कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ मिळून त्यांनी पक्की घरे बांधली आहेत. मात्र, ज्या जमिनीवर ते वर्षानुवर्षे शेती करत आहेत, ती जमीन अद्याप त्यांच्या नावे न झाल्याने संबंधित कुटुंबांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनासोबत गट क्रमांक ७० व १५ मधील बाधित आणि पात्र लाभार्थ्यांची यादीही सादर करण्यात आली. यामध्ये परसराम गणपत साळवे, बाळू कडुबा बनकर, गोविंद आसाराम कातवारे, कडुबा गणपत चाबुकस्वार, विठ्ठल आसाराम कातवारे, रघुनाथ चव्हाण, बंडू सखाराम साळवे, लक्ष्मीबाई गौतम साळवे, शकुंतला भानुदास साळवे, सीताबाई यशवंत नरवडे, ध्रुपदाबाई कडुबा बनकर, निवृत्ती धनाजी नरवडे, कडुबा सखाराम साळवे आणि भिकन बारकू माळे यांचा समावेश आहे.

आंदोलनाचा इशारा

" प्रशासनाने सर्व पात्र अतिक्रमणधारक तसेच मृत धारकांच्या कायदेशीर वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदवून गायरान जमीन नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. अन्यथा पँथर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाचे तालुका अध्यक्ष राजअनंत सुरतकर यांनी दिला."

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)