खुलताबाद (प्रतिनिधी) - खुलताबाद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात सोमवार (दि. १५ जून २०२६) रोजी विधी सेवा समितीच्या वतीने ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, कल्याण व संरक्षण’ या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर हक्कांबरोबरच त्यांच्या सन्मानपूर्वक संगोपनाची जबाबदारी समाजाने आणि कुटुंबाने स्वीकारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना मुख्य न्यायाधीश एम. के. शेख यांनी, मालमत्तेतील हक्कांप्रमाणेच आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारणे हे प्रत्येक अपत्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही केवळ नैतिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश पांडे उपस्थित होते. वकील संघाचे अध्यक्ष भास्कर नलावडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची सविस्तर माहिती देत, घरातील वयोवृद्धांकडे केवळ ज्येष्ठ नागरिक म्हणून नव्हे तर कुटुंबाची अमूल्य संपत्ती म्हणून पाहण्याचे आवाहन केले. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांनी शासनामार्फत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.दिनकर काळे यांनी केले. शिबिरास ॲड. इश्तियाक अब्बास पटेल, ॲड. उत्तम जाधव, ॲड. काझी अनिसोद्दीन व्ही., ॲड. मच्छिंद्र खोसरे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुधीर बनसोडे, ॲड. विजय राठोड, ॲड. एन. आय. बेग, ॲड. रसूल पठाण, ॲड. माजेत पटेल, ॲड. अशफाक शेख, ॲड. शेख अधीफ, ॲड. शेख जावेद, पोलीस कर्मचारी भीमराव सोनुले तसेच न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनासाठी न्यायालयाचे नाझर इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. मच्छिंद्र खोसरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क व संरक्षणाबाबत विविध मुद्द्यांवर माहिती देत आभार प्रदर्शन केले.


0 Comments