विशेष वृत्त: संदिप कसालकर
"मी थोडा वेळ झोपतो, पोलीस स्टेशन आल्यावर मला उठव..." ड्रायव्हरला हे शेवटचे शब्द सांगून गाडीत डोळे मिटलेले पोलीस अधिकारी पुन्हा कधी उठलेच नाहीत. घराकडून कर्तव्यावर निघालेल्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा प्रवासातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना आज सकाळी घडली.
कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुशील कुमार गायकवाड हे नेहमीप्रमाणे सकाळी उलवे (नवी मुंबई) येथील घरातून कामावर जाण्यासाठी निघाले होते. वडाळ्यापर्यंत आल्यावर त्यांना एका फोनवर बोलणे झाले. कामाचा वाढता व्याप आणि धावपळीमुळे थकवा जाणवत असल्याने त्यांनी चालकाला, "पोलीस स्टेशन आलं की मला उठव" असं सांगून गाडीतच डोळे टेकले. गाडी पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचली, चालकाने "साहेब, पोलीस स्टेशन आलं" म्हणत उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र गायकवाड यांची कोणतीही हालचाल झाली नाही.
तात्काळ त्यांना डी. एन. वाय. रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा श्वास थांबला होता. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांनी घेतलेल्या या अकाली एक्झिटमुळे पोलीस दलासह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतीच त्यांच्या एसीपी पदोन्नतीची यादीही आली होती आणि त्या यादीत त्यांचे नाव ७७ व्या क्रमांकावर झळकत होते. खांद्यावर मानाचे नवे स्टार लागण्याआधीच नियतीने त्यांच्यावर क्रूर घाला घातला.
त्यांच्या पश्चात गावाकडे राहणारे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि १० वी व १२ वीत शिकणाऱ्या दोन मुली असा परिवार आहे. वडिलांच्या छत्रछायेत शिक्षण घेणाऱ्या लेकींचे पितृछत्र अशा प्रकारे अचानक हरपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवस-रात्र सुरू असणारा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, सततचा ताणतणाव आणि त्यात स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पोलीस दलातील एका होतकरू अधिकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने खाकी वर्दीतील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments