खुलताबाद, 11 स्पटेंबर 2026 : तालुक्यातील वेरूळ येथे गुरुवारी (ता.१०) प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल व शिक्षण दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मातांना स्तनपान, शिशु पोषण, आई व बाळाची योग्य स्थिती तसेच नवजात बाळाला सुरक्षितपणे कसे हाताळावे, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. बाळाच्या जन्मापासूनच त्याचे वजन, शारीरिक वाढ व विकास याकडे नियमित लक्ष देण्याबरोबरच त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या योग्य देखभालीची माहिती मातांना देण्यात आली.कार्यक्रमादरम्यान घरात सहज उपलब्ध होणाऱ्या खाद्यपदार्थांचा वापर करून कमी खर्चात पौष्टिक आहार कसा तयार करता येतो, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मुलांच्या वयानुसार त्यांना कोणता आहार द्यावा, संतुलित पोषण, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मुलांच्या शारीरिक वाढीसोबतच त्यांच्या मानसिक व भावनिक विकासासाठी योग्य पोषण, प्रेमळ वातावरण आणि नियमित काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
जन्मापासून पुढील वयापर्यंत मुलांच्या वाढीवर नियमित लक्ष ठेवणे, वजन व विकासाची निगराणी करणे तसेच त्यांच्या गरजेनुसार योग्य व संतुलित आहार देणे आवश्यक आहे. याबाबत विविध उदाहरणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मातांना माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा योग्य वापर करून पौष्टिक भोजन तयार करण्यावर तसेच मुलांना संतुलित आहार देण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका जयश्री जाधव, मंगल फुलारे, आम्रपाली जाधव, रेखा डुकरे व वंदना चव्हाण यांनी शिशु पोषण, स्तनपान आणि मुलांचे योग्य संगोपन यासंदर्भात मातांना मार्गदर्शन केले. मातांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेत आवश्यक माहिती जाणून घेतली. मुलांचे उत्तम आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी प्रारंभिक अवस्थेपासूनच योग्य देखभाल व पोषण सुनिश्चित करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.



Comments